CCTV VIDEO | स्टेशनवर झोपलेल्या प्रवाशाला धक्का दिला, मग मोबाईल-पाकीट चोरले, 24 तासांत दोघांना अटक
सीसीटीव्ही फूटेजमध्ये एक प्रवासी रेल्वे प्लॅटफॉर्मच्या टेबलवर झोपलेला दिसत आहे. त्याच वेळी दोन चोर आले, त्यापैकी एक चोर टेबलावर बसून कोण येत नाही ना, याकडे लक्ष ठेवत होता. तोच चोर झोपलेल्या माणसाकडे गेला, प्रथम त्याला धक्का दिला,
मुंबई : मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या प्रवाशाचे पाकीट आणि मोबाईल फोन चोरणाऱ्या दोन चोरट्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सीसीटीव्हीच्या मदतीने 24 तासांच्या आत बोरीवली जीआरपी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
काय आहे मोडस ऑपरेंडी
पोलिसांनी पकडलेले हे चोर रात्रीच्या वेळी रेल्वे प्लॅटफॉर्मवर फिरतात. कोणता प्रवासी एकटा झोपला आहे, हे शोधून मग संधी मिळताच त्याचे मोबाईल फोन, पर्स, पैसे आणि मौल्यवान वस्तू चोरून पळून जातात. मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर 1 सप्टेंबरला झालेली चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती.
नेमकं काय घडलं?
सीसीटीव्ही फूटेजमध्ये एक प्रवासी रेल्वे प्लॅटफॉर्मच्या टेबलवर झोपलेला दिसत आहे. त्याच वेळी दोन चोर आले, त्यापैकी एक चोर टेबलावर बसून कोण येत नाही ना, याकडे लक्ष ठेवत होता. तोच चोर झोपलेल्या माणसाकडे गेला, प्रथम त्याला धक्का दिला, तो झोपला असल्याची खात्री केली. त्यानंतर चोराने त्याचा मोबाईल आणि पर्स चोरुन पोबारा केला. झोपलेल्या माणसाला जाग आली आणि त्याने उठून दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत दोघेही पळून गेले होते.
सीसीटीव्हीच्या मदतीने 24 तासांच्या आत बोरीवली जीआरपी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. बाबू राम बहादूर विश्वकर्मा आणि अख्तर अब्दुल शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही विरारचे रहिवासी आहेत.
पाहा व्हिडीओ :
शहापूर स्टेशनवर महिलेचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न
दुसरीकडे, कामानिमित्त शहाडला आलेल्या मुंबईकर महिलेच्या हातातील मोबाईल खेचण्याचा प्रयत्नही नुकताच रेल्वे स्टेशनवर झाला होता. यावेळी महिलेने प्रतिकार केला मात्र तिला हिसका देऊन मोबाईल हिसकावून चोरट्याने पळ काढला. या झटापटीत महिलेचे काही दागिने गायब झाले. मात्र महिलेने पाठलाग करत चोराला पकडले. याच दरम्यान एक पोलीस कर्मचारी आणि काही नागरिक त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी या चोरट्याला पकडले. शाहरुख गफूर शेख या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली होती.
मूकबधीर तरुणीवर बलात्कार करुन मोबाईल चोरी
दरम्यान, मूकबधीर तरुणीवर बलात्कार करुन, तिचा महागडा मोबाईल हिसकावून पसार झालेल्या आरोपीला कल्याण पोलिसांनी गुजरातहून अटक केल्याची घटना गेल्याच महिन्यात उघडकीस आली होती. मूकबधीर तरुणीवरील बलात्काराच्या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली होती. पहाटेच्या सुमारास मूकबधीर तरुणीवर बलात्कार करुन तिचा मोबाईल हिसकावून आरोपी पसार झाला होता. मात्र कल्याण स्थानकात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात आरोपी कैद झाला होता.
संबंधित बातम्या :
पैसे-मोबाईल दे, नाहीतर ठार मारेन, कल्याण स्टेशनवर तलवार दाखवून प्रवाशाला लुटण्याचा प्रयत्न
स्टेशनवर हिसका देऊन मोबाईल पळवला, पाठलाग करुन महिलेने चोरट्याला पकडलं