मुंबई : 29 वर्षीय लिव्ह इन पार्टनरची हत्या केल्याप्रकरणी 42 वर्षीय व्यक्तीला मुंबईत अटक करण्यात आली आहे. आरोपी राजू नाळे हा साकीनाका परिसरात टीव्ही तंत्रज्ञ म्हणून काम करत होता. बुधवारी संघर्ष नगर येथील आपल्या म्हाडा फ्लॅटमध्ये त्याने लिव्ह-इन पार्टनरवर चाकू हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या मनिषा जाधव या महिलेचा गुरुवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आधीची दोन लग्नं मोडलेल्या मनिषा जाधव यांचा लिव्ह इन पार्टनरने घात केल्याचं समोर आलं आहे. चारित्र्याच्या संशयातून 42 वर्षीय राजू नाळेने तिचा खून केल्याचा आरोप आहे.
आरोपी राजू नाळे याने पोलिसांना सांगितले की प्रेयसी मनिषा जाधव हिचे अन्यत्र प्रेमसंबंध असल्याचा त्याला संशय होता. जेव्हा त्याने मनिषाला याबद्दल विचारलं, तेव्हा दोघांमध्ये मोठा वाद झाला. रागाच्या भरात त्याने तिच्यावर अनेक वेळा चाकूने वार केले. मदतीसाठी तिने केलेला आरडाओरडा ऐकून शेजारी धावत आले आणि त्यांनी पोलिसांना बोलावले. टाईम्स ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर यासंबंधी वृत्त देण्यात आले आहे.
राजू नाळेने रक्ताने माखलेले कपडे बदलले होते. आम्ही त्याला पकडले तेव्हा तो पळून जाण्याच्या तयारी होता, असे वरिष्ठ निरीक्षक बळवंत देशमुख यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले. राजू आणि मनिषा या दोघांचीही आधी दोन-दोन वेळा लग्न झाली होती. मात्र त्यांचा घटस्फोट झालेला नाही. तीन वर्षांपासून ते लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये अंधेरीतील घरात एकत्र राहू लागले होते, अशी माहितीही एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.
नुकतंच, मुंबईतील डॉकयार्ड रोड रेल्वे स्टेशनवर महिलेचा गळा चिरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिच्या एक्स-बॉयफ्रेण्डला अटक करण्यात आली आहे. 23 वर्षीय मोहित आगळेला पोलिसांनी नवी मुंबई भागातून अटक केली. सुदैवाने मध्य रेल्वेच्या सिनिअर तिकीट बुकिंग ऑफिसरला वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे त्याने महिलेचे प्राण वाचवले, मात्र तिची प्रकृती गंभीर आहे. हार्बर रेल्वेवरील डॉकयार्ड रोड स्टेशनवर घडलेल्या हल्ल्याचा प्रकार स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला होता.
संबंधित बातम्या :
डॉकयार्ड रोड स्टेशनवर महिलेचा गळा चिरणारा सापडला, 23 वर्षीय एक्स बॉयफ्रेण्डकडून हल्ला