मुंबईतील गोकुळधाम सोसायटीतील मोबाईल दुकानात डल्ला, 167 महागडे फोन चोरीला
मुंबईतील गोकुळधाम सोसायटीत असलेल्या मोबाईल दुकानातून विविध कंपन्यांचे 167 महागडे मोबाईल फोन चोरीला गेले होते, ज्याची किंमत 32 लाख 38 हजार 338 रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई : मुंबईत दररोज चोरीच्या घटना घडतात, परंतु या वेळी चोरांनी टीव्हीच्या माध्यमातून जगभरात प्रसिद्ध झालेल्या एका रहिवासी इमारतीत लाखो रुपयांचा डल्ला मारला आहे. गोरेगाव पूर्वेला असलेल्या गोकुळधाम सोसायटीतील गोकुळ मोबाईल शॉप या दुकानाचे शटर तोडून लाखो रुपये किमतीच्या मोबाईलसह सीसीटीव्ही डीव्हीआर मशीन चोरट्यांनी चोरुन नेली होती. मात्र पोलिसांनी वेगाने तपास करत चौघा जणांना बेड्या ठोकल्या आणि त्यांच्याकडून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.
काय आहे प्रकरण?
22 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती आहे. ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात परिचित झालेल्या गोकुळधाम सोसायटीमध्ये चोरीचा प्रकार घडला. सोसायटीत असलेल्या गोकुळ मोबाईल या दुकानातून लाखोंच्या किमतीचे मोबाईल फोन आणि सीसीटीव्ही डीव्हीआर मशीन चोरीला गेले आहेत.
घटनेची माहिती मिळताच, मुंबई पोलिसांच्या झोन 12 च्या डीसीपी डॉ डी स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिसांनी 3 विशेष पथके तयार करून चोरांचा शोध सुरू केला. दिंडोशी पोलिसांनी मुंबईसह आसपासच्या भागातून चोरलेल्या संपूर्ण मुद्देमालासह चार चोरांना अटक केली आहे.
32 लाखांचे 167 महागडे मोबाईल
डीसीपी डॉ डी स्वामी यांनी सांगितले की मोबाईल दुकानातून विविध कंपन्यांचे 167 महागडे मोबाईल फोन चोरीला गेले होते, ज्याची किंमत 32 लाख 38 हजार 338 रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर, पोलिसांनी तीन विशेष पथके तयार केली आणि तीन ते चार दिवस सीसीटीव्ही फूटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली. कठोर प्रयत्नांनंतर पोलिसांनी चार आरोपींना मुंबई आणि आसपासच्या परिसरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे
1. महेंद्र कुमार थानाराम मेघवाल (मुख्य आरोपी) 2. मयूर संजय खैरे उर्फ जया (रिक्षा चालक) 3. रमेश ताराचंद पोरवाल 4. तेजस हरी आंबेकर उर्फ सोनू (व्यापारी-खरेदीदार)
रिक्षा-बुलेटच्या नंबर प्लेटवरुन शोध
अटक केलेले सर्व आरोपी सराईत चोर आहेत, त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत, चोरीच्या घटनेत वापरल्या जाणाऱ्या ऑटो रिक्षा आणि बुलेट बाईकच्या नंबर प्लेटवरून या चोरांना पकडण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
सोलापुरात लहान मुलांसह चोरी
दुसरीकडे, सोलापूर शहरातील लकी चौकात असलेल्या गणेश रामचंद्र आपटे या सराफ दुकानात खरेदीसाठी आलेल्या महिला ग्राहकाच्या पाटल्यांची चोरी झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यावेळी तीन महिला चोरांच्या सोबत एक लहान मुलगाही दिसत होता.
बॅगेतून पाटल्या लंपास
सोलापूर शहरातील विजापूर रोडवरील राजस्व नगरातील प्रभावती ज्ञानोबा शिरगिरे या आपल्या पाटल्या बदलून घेण्यासाठी लकी चौकातील गणेश रामचंद्र आपटे या सराफ दुकानात गेल्या होत्या. पाटल्या त्यांनी बॅगेत ठेवल्या होत्या, मात्र त्या दुकानात दागिने पाहत असताना त्याच वेळेस त्यांच्या बॅगेतून या महिला चोरांनी पाटल्या चोरल्या होत्या.
चोरी करुन महिला पसार
ही घटना सराफ दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेली होती. पाटल्या चोरून महिला तिथून लगेच पसार झाल्या. घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे पोलिस दाखल झाले. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेराची क्लिप पाहून चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
संबंधित बातम्या :
पाच महिलांची हातचलाखी, बसमध्ये बँक मॅनेजरच्या बॅगेतून अडीच लाख लांबवले, पुढे काय घडले?
VIDEO | ज्वेलरकडे खरेदीला आलेल्या ग्राहकाच्या पाटल्यांची चोरी, तीन महिला चोरांसोबत लहान मुलगाही
गाडीतून ऑईल गळती, लहान मुलाने गंडवलं, बँक कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने 50 लाखांची लूट टळली