मोहम्मद हुसैन खान, टीव्ही 9 मराठी, पालघर : प्रेमभंग झाल्यामुळे आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या एका तरुणाचा जीव पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत वाचवला आहे. मुंबईत राहणाऱ्या 27 वर्षीय तरुणाचे वसईत राहणाऱ्या तरुणीशी लग्न ठरले होते, मात्र तिने काहीही न कळवता परस्पर लग्न केल्यामुळे तरुण वसईतील टेकडीवरुन उडी घेत जीव देण्यास निघाला होता. सुदैवाने पोलिसांनी वेळीच पावलं टाकल्याने त्याचे प्राण बचावले. तरुण सुखरुप असल्यामुळे सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला.
काय आहे प्रकरण?
ब्रेकअप झाल्याच्या दुःखातून मुंबईतील 27 वर्षीय तरुण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता. वसईत राहणाऱ्या तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध होते. तिच्यासोबत त्याचे लग्नही ठरले होते. परंतु त्या मुलीने काहीही न सांगता परस्पर दुसऱ्या मुलासोबत लग्न केले. त्यामुळे हा तरुण निराश झाला झाला होता.
नेमकं काय घडलं?
शनिवारी सकाळी तो आत्महत्या करण्यासाठी वसई पूर्व भागातील नवजीवन झोपडपट्टी येथील गावदेवी मंदिर टेकडीवर गेला होता. ही माहिती मीरा भाईंदर वसई विरार अतिरिक्त पोलीस आयुक्त जयकुमार यांना मिळाली. त्यांनी तातडीने पावलं उचलत सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास वालीव पोलिसांना कळवलं. त्यासोबतच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे दोन कर्मचारी बालाजी गायकवाड आणि सचिन बळीद यांनी लगेच त्या ठिकाणी धाव घेतली.
फोनवर बोलण्यात गुंतवून ठेवलं
हा तरुण ज्या टेकडीवर होता, ती टेकडी अडीच हजार फूट उंचीवर होती. जवळपास 200 पायऱ्या चढायच्या होत्या. बळीद आणि गायकवाड यांनी त्याला फोनवर बोलण्यात गुंतवून ठेवलं आणि त्याला आत्महत्या करण्यापासून रोखले. पोलिसांना पोहोचण्यात पाच मिनिटं जरी उशीर झाला असता, तरी कदाचित त्याने उंच टेकडीवरुन खाली उडी मारुन जीव दिला असता. मात्र पोलिसांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे त्याचा जीव बचावला आहे. पोलिसांनी तरुणाचं समुपोदेशन करुन त्याला वडिलांच्या ताब्यात दिलं आहे.
साताऱ्यात नवविवाहित तरुणाचा टाकीवरुन आत्महत्येचा प्रयत्न
दुसरीकडे, सातारा नगरपालिकेच्या समोर असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला होता. गुरुवार पेठ भागात राहणाऱ्या या तरुणाने अक्षरशः शोले स्टाईल थरार केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याला वेळीच सुखरुप खाली उतरवण्यात यश आले.
घटनेच्या अवघ्या चार दिवसांपूर्वी या तरुणाचे लग्न झाले होते. मात्र कौटुंबिक वादामुळे मानसिक ताण निर्माण होऊन तो पाण्याच्या टाकीवर चढला आणि त्यातून त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तरुण थेट पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. या घटनेची माहिती मिळताच परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. पोलिसांनी तरुणाला समजावून त्याला खाली उतरवले. त्याचे व्यवस्थित समुपदेशन करुन त्याला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले
संबंधित बातम्या :
चार दिवसांपूर्वी विवाह, साताऱ्यातील तरुणाचा पाण्याच्या टाकीवरुन आत्महत्येचा प्रयत्न
आई-बहिणीला इंजेक्शन देऊन संपवलं, आत्महत्येचा प्रयत्न करणारी 30 वर्षीय डॉक्टर बचावली