मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या दोन खंडणीखोर नेत्यांना पोलिसांनी पैसे घेताना अटक केली आहे. दुकानदाराकडे 1 लाख 35 हजार रुपयांची मागणी केल्यानंतर वीस हजार रुपये घेताना पोलिसांनी दोघांना रंगेहाथ पकडले. मुंबईतील आरे कॉलनी परिसरात दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या.
कोणाकोणाला अटक?
मुंबईतील गोरेगाव पूर्व भागातील आरे कॉलनीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या दोन खंडणीखोर नेत्यांना पोलिसांनी पैसे घेताना रंगेहाथ अटक केली आहे. सूर्यप्रकाश भदर्गे (उपाध्यक्ष मुंबई, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) आणि रेखाताई मोरे (जिल्हा उपाध्यक्ष उत्तर-पश्चिम मुंबई, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.
दुकानदाराकडे खंडणीची मागणी
या दोन्ही खंडणीखोर आरोपींनी आरे कॉलनीमध्ये एका रेशनिंगचा दुकानाचे शिफ्टिंग असल्यामुळे दुकानदाराकडून 1 लाख 35 हजार रुपयांची मागणी केली होती, मात्र 20,000 रुपये घेताना आरे पोलिसांनी त्यांना रेड हँड अटक केली आहे.
आरे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता या दोन्ही खंडणीखोर नेत्यांनी आरे परिसरामधून मोठ्या संख्येने लोकांकडून खंडणी घेतल्याची माहिती समोर आली आहे. अटक केलेल्या आरोपींचे आणखी काही साथीदार आहेत का? याचा शोध आरे पोलीस घेत आहेत.
गुंड अश्विन नाईकची खंडणी प्रकरणात सुटका
दुसरीकडे, मयत गुंड अमर नाईकच्या भावाची अपहरण आणि खंडणी प्रकरणात निर्दोष सुटका करण्यात आली आहे. अश्विन नाईक आणि त्याच्या सात साथीदारांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. मुंबई सत्र न्यायालयाने या प्रकरणात मंगळवारी निकाल दिला.
डिसेंबर 2015 मध्ये अश्विन नाईक आणि त्याच्या साथीदारांवर अपहरण आणि खंडणीच्या खटल्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाईकने त्याच्या सात साथीदारांसोबत मुंबईच्या दादर भागातील एका बिल्डरचे अपहरण केल्याचा आरोप होता. 50 लाख रुपयांची खंडणी आणि 6 हजार चौरस फूटाचा फ्लॅट मागितल्याचा त्याच्यावर आरोप झाला होता.
मुंबई सत्र न्यायालयाने नाईकसह सातजणांची निर्दोष मुक्तता केली. अश्विन नाईकसोबत प्रमोद केळुस्कर, प्रथमेश परब, जनार्दन सकपाळ, राजेश तांबे, अविनाश खेडेकर, मिलिंद परब आणि सूरज गोवर्धन अशी दोषमुक्त झालेल्या इतर आरोपींची नावं आहेत.
पुण्यातील बिल्डरकडे खंडणीची मागणी, शेतकऱ्याला अटक
दुसरीकडे, एका बांधकाम व्यावसायिकाकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली पिंपरी चिंचवड पोलिसांनी 46 वर्षीय शेतकरी आणि त्याच्या दोन मुलांना रविवारी अटक केली. तिघे आरोपी आपल्याला गेल्या पाच महिन्यांपासून त्रास देत असल्याचे बिल्डरने आपल्या तक्रारीत म्हटले होते. आपल्या दोन कंत्राटदारांकडून त्यांनी 75 हजार रुपये उकळल्याचा दावाही बिल्डरने केला होता.
संशयित सत्यवान तापकीर आणि त्यांची मुलं आकाश (25) आणि सागर (23) यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती दिघी पोलिस उपनिरीक्षक सुनील भदाणे यांनी दिली. “तिघे आरोपी बांधकाम व्यावसायिकाला त्यांच्याकडूनच सर्व साहित्य खरेदी करण्यास भाग पाडत होते. जेव्हा तक्रारदाराने त्यांना नकार दिला, तेव्हा त्यांनी त्याच्या ठेकेदारांना धमकी दिली आणि त्यांच्याकडून 75,000 रुपये घेतले” असेही भदाणे म्हणाले. त्यानंतर आरोपींनी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची मागणी केली आणि त्याच्या वाहनांची तोडफोड करण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे.
संबंधित बातम्या :
विनयभंगाच्या तक्रारीची धमकी, पुण्यातील नगरसेवकाकडे 15 लाखांच्या खंडणीची मागणी
दादरच्या बिल्डरचे अपहरण-खंडणी प्रकरण, अश्विन नाईकसह सात साथीदारांची निर्दोष मुक्तता