पादचाऱ्याचा मोबाईल हिसकावला, मुंबईतील कुप्रसिद्ध मोबाईल चोराला अखेर बेड्या
तक्रारदार तरुण मोबाईलवर बोलत चालला होता. त्यावेळी दोन आरोपी दुचाकीवर आले. त्यांनी तरुणाला थांबायला सांगितलं आणि त्याची बॅग हिसकवायला सुरुवात केली, हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे
मुंबई : मुंबईतील कुप्रसिद्ध मोबाईल चोराला मालवणी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने अटक केली आहे. फोनवर बोलत जाणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकावून चार दिवसांपूर्वी दोघा आरोपींनी पोबारा केला होता. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पाहून पोलिसांनी चोराला बेड्या ठोकल्या.
नेमकं काय घडलं?
पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने यांनी सांगितले की, 24 ऑगस्टच्या रात्री तक्रारदार युवक मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फोनवर बोलत घराच्या दिशेने जात होता. त्यावेळी दुचाकीवर दोघे मोबाईल स्नॅचर्स आले. त्यांनी तरुणाला रस्त्यात थांबवले आणि जबरदस्ती त्याचा मोबाईल हिसकावून पळ काढला. या घटनेचे फूटेज सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते.
व्हिडीओमध्ये काय दिसतं?
तक्रारदार तरुण मोबाईलवर बोलत चालला होता. त्यावेळी दोन आरोपी दुचाकीवर आले. त्यांनी तरुणाला थांबायला सांगितलं. काही वेळाने दोन्ही आरोपी त्याच्याकडे आले. त्यांनी त्याची बॅग हिसकवायला सुरुवात केली, पण ती बॅग सोडत नसल्याने दोन्ही आरोपींनी तरुणाचा मोबाईल घेऊन पळ काढला.
या घटनेनंतर मालवणी पोलिसांनी साकिब कुरेशी नावाच्या आरोपीला अटक केली आहे, तपासात असे आढळून आले आहे की त्याच्यावर मुंबईच्या इतर अनेक पोलीस ठाण्यातही काही गुन्हे दाखल आहेत.
पुण्यातही महिलेचा मोबाईल चोरीला
दुसरीकडे, पादचारी महिलेचा मोबाईल आणि पर्स लुटून चोरांनी पळ काढल्याचा प्रकार नुकताच पुण्यात उघडकीस आला होता. हडपसर भागात दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. महिलेने एक किलोमीटरपर्यंत चोरांचा पाठलागही केला, मात्र ते हाती लागले नाहीत.
संबंधित बातम्या :
CCTV VIDEO | पुण्यात महिलेचा पर्स-मोबाईल लुटून दोघे पसार, पाठलागाचा थरार सीसीटीव्हीत कैद
Pune Crime | पुण्यात रस्त्याने एकटं जात असताना चोरांनी लुटले, घटना सीसीटीव्हीत कैद
पुण्यात महिलेला वडापाव खाण्याची इच्छा पडली 8 लाखांना! रक्षबंधनाच्याच दिवशी घडली घटना