दहा रुपयांच्या सिगारेटवरुन वाद, टोळक्याचा दुकानावर हल्ला, दुकानदाराच्या वडिलांची हत्या
सिगरेट न दिल्यामुळे चिडलेल्या तरुणांनी सतेंद्रसोबत बाचाबाची केली. मात्र वादानंतर ते निघून गेले. मात्र काही वेळाने या चौघा जणांसोबत जवळपास 15 ते 20 जणांचं टोळकं दुकानाजवळ आलं
पालघर : सिगरेट न दिल्याच्या कारणावरुन (Cigarette) दुकानदाराची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दुकान बंद झाल्यानंतर सिगरेट न दिल्यावरुन दुकानदाराचा आरोपीशी (Shopkeeper Murder) वाद झाला होता. यावेळी दुकानदाराचा गळा चिरुन जीव घेण्यात आला. पालघर जिल्ह्यातील बोईसर (Boisar Palghar) वारंगडे गावात हा प्रकार घडला. अवघ्या दहा रुपयांच्या सिगरेटवरुन झालेल्या वादावादीतून दुकानदाराला प्राण गमवावे लागले. तर दुकानदाराच्या बचावासाठी मध्ये पडलेले तिघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. विनोद सिंग असे हत्या झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. बोईसर पोलीस ठाण्यात या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 7 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तीन जखमी व्यक्तींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
काय आहे प्रकरण?
बोईसर पूर्व भागात वारांगडे गावात सतेंद्रकुमार याचे किराणामालाचे दुकान आहे. त्याच्यासोबत त्याचे रिक्षाचालक वडील विनोद सिंग हे काही महिन्यांपूर्वी राहायला आले होते. रात्री गावातील तीन ते चार तरुण किराणा मालाच्या दुकानाजवळ आले. त्यांनी सतेंद्रकुमार याच्याकडे सिगारेटची मागणी केली. मात्र दुकान बंद झाल्याचं सांगत त्याने सिगरेट देण्यास नकार दिला.
टोळक्याचा दुकानावर हल्ला
सिगरेट न दिल्यामुळे चिडलेल्या तरुणांनी सतेंद्रसोबत बाचाबाची केली. मात्र वादानंतर ते निघून गेले. मात्र काही वेळाने या चौघा जणांसोबत जवळपास 15 ते 20 जणांचं टोळकं दुकानाजवळ आलं. सिगरेट न दिल्याच्या आणि वाद घातल्याचा राग मनात ठेवून त्यांनी सतेंद्र कुमारच्या किराणा दुकानावर हल्ला चढवला.
मारहाणीत वडिलांचा मृत्यू
काही हल्लेखोर दुकानाचे शटर आणि खिडकी तोडून घरात घुसले. सतेंद्रच्या बचावासाठी आलेल्या तिघा जणांना त्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत वडील विनोद सिंग यांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
बोईसर पोलीस ठाण्यात या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 7 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तीन जखमी व्यक्तींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
संबंधित बातम्या :