‘सावधान इंडिया’ फेम दोन अभिनेत्री झाल्या क्रिमिनल, मुंबईतील उच्चभ्रू इमारतीत चोरी
'क्राईम पेट्रोल', 'सावधान इंडिया' यासारख्या गुन्हेविषयक मालिकांसह अनेक वेब सीरीजमध्येही आरोपी अभिनेत्री सुरभी श्रीवास्तव आणि मोसिना मुख्तार शेख यांनी काम केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मुंबई : ‘क्राईम पेट्रोल’, ‘सावधान इंडिया’ यासारख्या गुन्हेविषयक मालिकांमध्ये भूमिका साकारणाऱ्या दोन अभिनेत्रींना अटक करण्यात आली आहे. मुंबईतील उच्चभ्रू इमारतीत चोरी केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. कोरोना काळात मालिकांचं शूटिंग बंद असल्यामुळे दोघींची पावलं गुन्हेगारीकडे वळल्याचं दिसत आहे. (Savdhaan India fame two actress arrested in theft case at Aarey Colony)
पेईंग गेस्टकडे चोरी
मालिकांचं चित्रीकरण बंद असल्यामुळे दोघी अभिनेत्रींना पैशांची कमतरता जाणवत होती. त्यांचा एक मित्र गोरेगावच्या आरे कॉलनी परिसरात पेईंग गेस्टची व्यवस्था करतो. आरे कॉलनीतील रॉयल पाम या उच्चभ्रू इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात 18 मे रोजी त्या पेईंग गेस्ट म्हणून गेल्या. दरम्यानच्या काळात या घरात आधीपासून राहणाऱ्या पेईंग गेस्टकडे त्यांनी चोरी केली. लॉकरमध्ये ठेवलेली 3 लाख 28 हजार रुपये घेऊन त्या पसार झाल्या.
सीसीटीव्हीमध्ये चोरी पकडली
25 वर्षीय सुरभी सुरेंद्र लाल श्रीवास्तव आणि 19 वर्षीय मोसिना मुख्तार शेख या दोघींनी आपले पैसे चोरल्याचा संशय तक्रारदाराने पोलिसांकडे व्यक्त केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर दोघीही इमारतीतून बाहेर पळून जाताना दिसल्या.
पैशाच्या तंगीमुळे चोरीकडे पावलं
पोलिसांनी दोघींना ताब्यात घेत चौकशी केली, मात्र त्यांनी गुन्हा कबूल करण्यास इन्कार केला. अखेर पोलिसांनी त्यांना सीसीटीव्ही फूटेजमध्ये त्यांच्या हातात असलेली पैशांची थैली दाखवली, तेव्हा दोघींचा बांध फुटला आणि त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. कोरोना काळात मालिकांचं शूटिंग बंद असल्यामुळे आपल्याला पैशांची तंगी जाणवत असल्याचं त्यांनी सांगितलं.
दोघींना पोलीस कोठडी
‘क्राईम पेट्रोल’, ‘सावधान इंडिया’ यासारख्या गुन्हेविषयक मालिकांसह अनेक वेब सीरीजमध्येही आरोपी अभिनेत्री सुरभी श्रीवास्तव आणि मोसिना मुख्तार शेख यांनी काम केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचे 50 हजार रुपये जप्त केले आहेत. दोघींना कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना 23 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
पोलीस स्टेशनसमोरच चालकाचा ट्रकला गळफास, चोरीचा गुन्हा नोंदवल्यानंतर आत्महत्या
चैनीसाठी आलिशान गाडीतून बोकड चोरीचा हायटेक फार्म्युला, सांगली पोलिसांनी 5 आरोपींना ठोकल्या बेड्या
(Savdhaan India fame two actress arrested in theft case at Aarey Colony)