VIDEO | डोंबिवलीत पाणी टंचाईने 5 जणांचा बळी, केडीएमसीचे अधिकारी मात्र नाच-गाण्यात दंग
रविवारी सकाळी पोलीस प्रशासनाच्या वतीने हॅप्पी स्ट्रीट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त सुनील पवार हे गाणी गाताना दिसत होते. तर इतर अधिकारी नाचताना दिसत होते.
डोंबिवली : डोंबिवलीच्या (Dombivali) 27 गावातील पाणी टंचाईमुळे देसलेपाडा इथे एकाच कुटुंबातल्या पाच जणांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना (Family Death) नुकतीच घडली आहे. या घटनेला 24 तास उलटत नाहीत, तोच दुसरीकडे कल्याण डोंबिवली महापालिका अर्थात केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त (KDMC Officers) आणि अधिकारी नाच-गाण्यात दंग असल्याचं समोर आलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चांगलंच संतापाचं वातावरण आहे.
मनसे आणि भाजप यांनी काही दिवसांपूर्वी केडीएमसीवर पाण्यासाठी मोर्चा काढला होता. त्यावेळी मनसे आमदार राजू पाटील आणि भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी केडीमसीच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले होते. त्यावेळी केडीमसीचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी पाण्यासाठी उपायोजना करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र अजूनही 27 गावांत पाण्याची टंचाई कायम आहे.
नेमकं काय घडलं?
त्यातच देसलेपाडा इथल्या एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा संदपच्या खदानीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर पालिका अधिकाऱ्यांनी किमान ग्रामस्थांची भेट घेणं आवश्यक होतं. मात्र ते न करता अतिरिक्त आयुक्तांसह इतर पालिका अधिकारी नाच-गाण्यात दंग असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
हॅप्पी स्ट्रीट कार्यक्रम
रविवारी सकाळी पोलीस प्रशासनाच्या वतीने हॅप्पी स्ट्रीट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त सुनील पवार हे गाणी गाताना दिसत होते. तर इतर अधिकारी नाचताना दिसत होते. हा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल होत असून यावरून नागरिक मात्र संताप व्यक्त करतायत.
पाहा व्हिडीओ :
VIDEO | डोंबिवलीत पाणी टंचाईने 5 जणांचा बळी, केडीएमसीचे अधिकारी मात्र नाच-गाण्यात दंग #Dombivali pic.twitter.com/WVI2Q2Ydll
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 10, 2022
दरम्यान हे समजताच पालिकेला जाग आली. महापालिका अधिकाऱ्यांनी तातडीने या खदानीची पाहणी केली. त्यानंतर संदपच्या खदानीतील पाणी बाहेर काढून मोठमोठ्या टाक्यांमध्ये भरून ठेवण्यात आलं. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील महिलांना कपडे धुण्यासाठी हे पाणी वापरता येईल.
15 एमएलडी पाणी वाढवून देण्याची मागणी
याबाबत अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांना विचारलं असता, एमआयडीसीकडून 27 गावांना पाणी पुरवठा केला जातो. हा पाणी पुरवठा कमी प्रमाणात व कमी दाबाने होत असल्यामुळे अमृत योजना कार्यान्वित होईपर्यंत आणखी 15 एमएलडी पाणी वाढवून देण्याची मागणी एमआयडीसीकडे करण्यात आली आहे.
मानपाडा इथून पंपाने पाणी भोपर, देसलेपाडा या पाण्याचं दुर्भिक्ष्य असलेल्या ठिकाणी पोहचवण्याबाबत टेंडर मागवण्यात आले असून त्याबाबत निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. संदपमध्ये घडलेल्या दुदैवी घटनेची पुनरावृत्ती होवू नये, म्हणून सदर खदानी भोवती महापालिकेच्या अग्निक्षमन विभागामार्फत जीवरक्षकांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचं अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी सांगितलं.