ठाण्यात शिवसेना विभागप्रमुखावर जीवघेणा हल्ला, श्रीरंग सोसायटी शाखेतच चाकूने वार
अचानक आलेल्या चार-पाच जणांनी अमित जैस्वाल यांच्या डोक्यावर आणि खांद्यावर ज्या प्रकारे प्राणघातक हल्ला केला, त्यावरून हल्लेखोरांचा त्यांना जीवे ठार मारण्याचाच डाव होता, असा अंदाज वर्तवला जात आहे.
ठाणे : ठाण्यातील श्रीरंग सोसायटी विभागातील शिवसेनेचे विभागप्रमुख अमित जैस्वाल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याने ठाण्यात मोठी खळबळ उडाली आहे. महत्वाचं म्हणजे काही अज्ञात इसमांनी थेट श्रीरंग सोसायटी शाखेतच हा हल्ला केला.
नेमकं काय घडलं?
अचानक आलेल्या चार-पाच जणांनी अमित जैस्वाल यांच्या डोक्यावर आणि खांद्यावर ज्या प्रकारे प्राणघातक हल्ला केला, त्यावरून हल्लेखोरांचा त्यांना जीवे ठार मारण्याचाच डाव होता, असा अंदाज वर्तवला जात आहे. राबोडी पोलीस स्थानकात अज्ञात चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
हल्ल्याचं कारण काय?
अमित जैस्वाल यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्याचे नगरविकासमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर नरेश म्हस्के यांनी इस्पितळाला भेट देऊन तब्येतीची माहिती घेतली. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिवसैनिकांची दुहेरी हत्या, पाच जणांना अटक
दरम्यान, सोलापुरातील मोहोळमध्ये शिवसैनिकांची दुहेरी हत्या केल्याप्रकरणी पाच जणांना काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली होती. नगरपरिषदेच्या राजकारणातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकाची हत्या केल्याचा प्रकार 15 जुलै 2021 रोजी समोर आला होता. शिवसैनिकांच्या बाईकवर टेम्पो घालून अपघात असल्याचं भासवत हत्या करण्यात आली होती. कर्नाटक राज्यात लपून बसलेल्या 5 संशयित आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. शिवसैनिक विजय सरवदे आणि सतीश क्षीरसागर यांचा अपघाताच्या आडून खून झाला होता.
पुण्यात घडलेला युवासेना पदाधिकाऱ्याच्या खुनाचा थरार
दुसरीकडे, पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील युवासेना पदाधिकारी दीपक मारटकर यांची गेल्या वर्षी निर्घृण हत्या करण्यात आली होती. दीपक मारटकर यांच्यावर पाच ते सहा जणांनी मध्यरात्री हल्ला केला होता. दीपक मारटकर हे शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांचे चिरंजीव होते.
संबंधित बातम्या :
युवासेना जिल्हा प्रमुखावर जीवघेणा हल्ला, शिवसेना पदाधिकाऱ्यावरच आरोप
बाईकवर टेम्पो घातला, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सोलापुरात शिवसैनिकाची हत्या
शिवसेना माजी शहरप्रमुख राहुल शेट्टी यांची हत्या; 24 तासात दोन हत्येच्या घटनांनी लोणावळा हादरलं