राजसाहेब, गजानन काळेंची मनसेतून तात्काळ हकालपट्टी करा, तृप्ती देसाईंची आक्रमक मागणी
"पोलीस सांगतात की तुम्ही एफआयआर मागे घ्या किंवा सेटलमेंट करा, तडजोड करा. एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर महिलेला न्याय देण्याचं काम पोलिसांचं असतं, सेटलमेंट करण्याचं नाही." असं तृप्ती देसाई खडसावून म्हणाल्या.
मुंबई : मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे (Gajanan Kale MNS) यांच्या पत्नी संजीवनी काळे (Sanjeevani Kale) यांनी पतीविरोधात मानसिक आणि शारीरिक छळासह विवाहबाह्य संबंधांचा आरोप केला आहे. त्यानंतर, गजानन काळेंची नवी मुंबई मनसे शहराध्यक्षपद आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून हकालपट्टी करा, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केली आहे.
तृप्ती देसाईंची मागणी काय?
“गजानन श्रीकृष्ण काळे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीने नवी मुंबई पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. मात्र दोन दिवस झाले आरोपीला अटक झालेली नाही. त्यानंतर संजीवनी काळे यांना पोलीस सांगतात की तुम्ही एफआयआर मागे घ्या किंवा सेटलमेंट करा, तडजोड करा. एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर महिलेला न्याय देण्याचं काम पोलिसांचं असतं, सेटलमेंट करण्याचं नाही.” असं तृप्ती देसाई खडसावून म्हणाल्या.
“राज्यामध्ये गृहमंत्री काय करत आहेत, एखादी महिला अन्याय झाल्यानंतर वाचा फोडते, गुन्हा दाखल करते, त्या आरोपीला पहिलं अटक करा ना, तातडीने गजानन काळेंना अटक झाली पाहिजे. ते मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष आहेत. त्यामुळे मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना माझी विनंती आहे, आपण महिलांच्या सन्मानासाठी काम करता, परंतु गजानन काळेंनी ज्या पद्धतीने शारीरिक, मानसिक त्रास संजीवनी काळेंना दिला आहे. त्यावर मनसेची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, हे दुर्दैव आहे. त्यामुळे आपण तातडीने आपण मनसेच्या नवी मुंबई शहराध्यक्ष पद आणि पक्षातून गजानन काळेंची हकालपट्टी करावी, अशी भूमाता ब्रिगेडची मागणी आहे.” असंही तृप्ती देसाई म्हणाल्या.
गजानन काळे यांच्यावर गुन्हा दाखल
मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीनेच तक्रार दाखल केली आहे. गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे (Sanjivani Kale) यांनी पतीविरोधात अनेक गंभीर आरोप करत नेरुळ पोलिस स्थानकात (Nerul Police Station) तक्रार दाखल केली आहे.
मानसिक आणि शारिरीक छळवणूक करणे या आणि अशा आदी कलमांखाली काळे यांच्या पत्नीकडून नेरुळ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेल्या काही वर्षापासून गजानन काळे आपल्याला मारहाण करत असल्याचंही त्यांच्या पत्नीने तक्रारीत म्हटलं आहे. तसंच त्यांचे अनेक स्त्रियांशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.
संबंधित बातम्या :
अनेक स्त्रियांशी संबंध, जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण, मनसे नेते गजानन काळेंवर पत्नीचे गंभीर आरोप
Video: गजानन काळेंच्या पत्नीवर सेटलमेंटसाठी दबाव? चित्रा वाघ म्हणतात, हे काय चाललंय राज्यात?