ईडीची दिवसभर छापेमारी, नागपूर-मुंबईच्या निवासस्थानी धाडी, अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया काय?
"मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप केले", असं अनिल देशमुख म्हणाले Maharashtra Former Home Minister Anil Deshmukh first reaction ED raid on his house).
मुंबई : “मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. त्यांना पदावरुन हटवल्यानंतर त्यांनी माझ्यावर आरोप केले. त्यांच्या संशयास्पद भूमिकेवरुन त्यांना आयुक्तपदावरुन हटवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी आरोप केले. त्यांना आरोप करायचे होते तेव्हा ते आयुक्त असताना त्यांनी माझ्यावर आरोप करायला हवे होते”, अशी भूमिका माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मांडली. देशमुख यांनी आज अखेर संध्याकाळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देऊन आपली बाजू मांडली (Maharashtra Former Home Minister Anil Deshmukh first reaction ED raid on his house).
अनिल देशमुख नेमकं काय म्हणाले?
“ईडीचे काही अधिकारी चौकशीसाठी आले होते. त्यांना सहकार्य केलं आणि पुढील काळातही करु. परमबीर सिंग जे पोलीस आयुक्त होते. त्यांनी जे माझ्यावर खोटे आरोप केले होते. पदावरुन हटवल्यानंतर त्यांनी आरोप केले. त्यांना आरोप करायचे होते तर त्यांनी पदावर असताना करायचे होते. परमबीर सिंग आयुक्त होते तेव्हा उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं सापडलेलं प्रकरण, मनसुख हिरेन हत्या प्रकरण झालं त्यातील आरोपी एपीआय सचिन वाझे, रियाझुद्दीन काझी, विनायक शिंदे सुनील माने हे मुंबई पोलीस आयुक्तालयात काम करत होते. ते आयुक्तांना रिपोर्टिंग करत होते”, असं अनिल देशमुख म्हणाले.
“उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक सापडले, तसेच मनसूख हिरेन प्रकरण यामध्ये सापडलेले पोलीस अधिकारी हे मुबंई पोलीस आयुक्तालयात कामाला होते. ते सर्व परमबीर सिंगाना रिपोर्ट करायचे. या प्रकरणातील आरोपी ठरलेले पाचही अधिकारी परमबीर सिंग यांना रिपोर्ट करायचे. त्यामुळे परमबीर सिंग यांची भूमिका संशयास्पद होती. त्यामुळे त्यांची बदली करण्यात आली. पण त्यांना पदावरुन हटवल्यानंतर त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. माझ्याकडून ईडी आणि सीबीआयच्या तपासाला सहकार्य करेन”, अशी भूमिका अनिल देशमुख यांनी मांडली (Maharashtra Former Home Minister Anil Deshmukh first reaction ED raid on his house).
दिवसभरात काय-काय घडलं?
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीची धडक कारवाई सुरु आहे. ईडी अधिकाऱ्यांनी याप्रकरणी सकाळपासून तब्बल पाच ठिकाणी छापेमारी केली आहे. यामध्ये देशमुख यांच्या नागपुरातील घराचा देखील समावेश आहे. तसेच ईडीने देशमुख यांच्या नागपुरात व्यावसायातील भागीदार असलेल्या व्यवसायिकाच्या घरीदेखील छापा टाकला आहे. याशिवाय मुंबईतील देशमुख यांचं शासकीय निवासस्थान असलेला ज्ञानेश्वरी बंगला, त्यांचं स्वत:चं वरळी येथील घर असलेली सुखदा इमारत तसेच त्यांचा CA राहत असलेल्या वरळी येथील घरी देखील ईडीने छापा टाकला आहे. ईडीची सकाळपासून ही कारवाई सुरु आहे. अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक अशी ही कारवाई केली जात असल्याचं निदर्शनास आलं. प्रत्येक छापेमारीवेळी ईडीसोबत सीआरएफ जवनांचं एक पथकही घटनास्थळी दाखल होते.
अनिल देशमुख यांच्या मुंबईतील निवासस्थानी सकाळपासून काय-काय घडलं?
ईडी अधिकारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सीआरपीएफ जवानांच्या एका पथकासह अनिल देशमुख यांच्या मुंबईतील खासगी निवासस्थान असलेल्या सुखदा इमारतीत पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत जवळपास 10 सीआरपीएफ जवान होते. त्याचबरोबर त्यांच्यासोबत फॉरेन्सिक टीमही होती. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास दोन गाड्या सुखदा इमारतीच्या परिसरात आल्या. यापैकी पुढच्या गाडीत स्वत: अनिल देशमुख होते. ईडी अधिकाऱ्यांनी देशमुख यांच्या कुटुंबियांचे आणि निकटवर्तीयांचे मोबाईल आणि डिजीटल डेटा ताब्यात घेतला. त्यानंतर फॉरेन्सिक टीम दुपारी अडीच्या सुमारास सुखदा इमारतीतून बाहेर पडताना दिसली.
देशमुख यांच्या नागपुरातील घरी सकाळपासून काय-काय घडलं?
ईडीचे दोन पथक आज सकाळी 8 वाजता अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या सिव्हिल लाईन भागातील ‘श्रद्धा’ या निवासस्थानी पोहचले. यावेळी अनिल देशमुख हे घरी नव्हते. ते मुंबईतील त्यांच्या ‘ज्ञानेश्वरी’ या शासकीय निवासस्थानी होते. देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्य आणि काही कर्मचारी घरात होते. या सर्वांची चौकशी ईडीच्या अधिकाऱ्यांनी केली. या कारवाईत ईडी अधिकाऱ्यांनी काही कागदपत्रांची तपासणी केली. तसेच काही कागदपत्रे जप्त केली. महत्वाचे म्हणजे यावेळी केंद्रीय राखीव दलाचे साधारणतः 20 सशस्त्र जवानांनी देशमुख यांच्या घराला वेढा घातला होता. सोबतच शहर पोलीस दलातील पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. सुरुवातीला शहर पोलिसांना या छाप्याची माहिती नव्हती. अत्यंत गोपनीय पद्धतीनं हा छापा टाकण्यात आला.
ज्ञानेश्वरी बंगल्यात काय-काय घडलं?
नागपुरात ईडीची छापेमारी सुरु असताना ईडीच्या दुसऱ्या पथकांनी अनिल देशमुख यांच्या मुंबईतील घरी देखील छापे टाकले. देशमुख सध्या मुंबईत वास्तव्यास आहेत. ईडीने देशमुख यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर छापा टाकला. अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांनी त्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ज्ञानेश्वरी बंगल्याचा ताबा सोडलेला नाही. विशेष म्हणजे हा बंगला वर्षा बंगल्याच्या अगदी बाजूलाच आहे. या बंगल्यात ईडीचे अधिकारी पोहोचले. तसेच सीआरपीएफ जवानांची एक टीमसुद्धा या ठिकाणी पोहोचली.
4 कोटी रुपये हप्ता दिला, बार मालकांची कबुली
एकीकडे ईडीकडून अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानी सकाळपासून छापेमारी सुरु आहे. तर दुसरीकडे ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील काही बार मालकांचेही जबाब नोंदवल्याचं कळतंय. सुमारे 10 ते 12 बार मालकांचा जबाब ईडीने नोंदवला आहे. त्यात या बार मालकांनी मिळून काही महिने 4 कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली दिली आहे. त्याच अनुषंगाने आता ईडीची कारवाई सुरु असल्याचं कळंतय.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं. देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, आदी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रं लिहून हे आरोप केले होते.
संबंधित बातम्या :
अनिल देशमुखांना धक्क्यावर धक्के, ईडीचे सकाळपासून तब्बल पाच ठिकाणी छापे