मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्याचे ईमेल हॅक, धक्कादायक माहिती समोर
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्याचा मेल हॅक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. संबंधित प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. आरोपीने इतकं मोठं धाडस नेमकं का केलं? याबाबतची माहिती देखील समोर आली आहे.
कृष्णा सोनारवाडकर, Tv9 मराठी, मुंबई | 5 ऑक्टोबर 2023 : गुन्हेगार किती भयानक असतात याची आपण कल्पना देखील करु शकणार नाही. या गुन्हेगारांचं धाडस थेट राज्याच्या गृहमंत्रालयाला हादरवण्यापर्यंत पोहोचलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांचा ईमेल हॅक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. आरोपीने ईमेल हॅक करुन विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट आदेश काढला. पोलिसांच्या सायबर सेलने आरोपीच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्याला अटक करण्यात आलीय. आरोपीने अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढल्याची माहिती तपासातून समोर आलीय.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी विद्याधर महाले यांच्या नावाचा गैरवापर करुन ईमेल आयडी हॅक करुन बनावट आदेश काढण्यात आल्याची माहिती समोर आलीय. या प्रकरणी पोलिसांच्या सायबर सेलने आरोपीला अटक केली आहे. आरोपीने बदलीचे बनावट आदेश काढल्याचं तपासात उघड झालंय. आरोपीने बनावट आदेश काढून लोकांकडून पैसे उकळल्याचं समोर आलंय.
आरोपीला मिरजमधून अटक
आरोपीला मिरजमधून अटक करण्यात आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 6 अधिकाऱ्यांचे बनावट आदेश काढण्यात आलेले होते. गृहमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी विद्याधर महाले यांचा ईमेल आयडी हॅक करुन बदलीसंदर्भात सूचना दिल्या गेल्या. त्यानंतर आदेश काढण्यात आला.
आरोपी नेमका कोण आहे?
या प्रकरणांची गंभीरता लक्षात घेऊन स्टेट सायबरने गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. आरोपी मोहम्मद इलियास याला अटक करण्यात आली आहे. आरोपीने महावितरणमधील काही अधिकाऱ्यांच्या बदलीसंदर्भात बनावट आदेश काढले होते. आरोपीने गृहमंत्री फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी विद्याधर महाले यांच्या नावाचा बनावट ईमेल आयडी तयार केला होता. आरोपी बीई इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहे.
आरोपीने फडणवीसांची सही वापरली
आरोपीने बनावट पद्धतीने काढलेल्या बदली आदेशावर गृहमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची सही कॉपीपेस्ट करण्यात आलीय. आरोपीने एकूण 6 अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले होते. आरोपी मूळचा सांगलीच्या मिरजमधला असून तो खाजगी कंत्राटदार आहे. आरोपी उच्चशिक्षित असल्याने त्याने हे कृत्य एकट्याने केले असावे असा अंदाज. आरोपीने अधिकाऱ्यांशी आधी पैशांचा व्यवहार केल्याचा संशय आहे. सायबर सेलकडून सबंधित 6 अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे.
बनावट आदेशमध्ये समावेश असलेल्या अधिकाऱ्यांची नावे:
1) गणेश मुरलीधर असमर (उपकार्यकारी अभियंता)
2) दुर्गेश जगताप (सहायक अभियंता)
3) मनीष धोटे (सहायक अभियंता)
4) यशवंत गायकवाड (सहायक अभियंता)
5) ज्ञानोबा राठोड (सहायक अभियंता)
6) योगेश आहेर (सहायक अभियंता)