गोविंद ठाकुर, Tv9 मराठी, मुंबई | 29 सप्टेंबर 2023 : मुंबई सर्वात सुरक्षित शहर आहे, असं मानलं जातं. पण या शहरातही काही अनपेक्षित अशा घटना घडत असतात. मुंबई पोलीस त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी प्रसिद्ध आहेतच. पण मुंबईच्या पोटात गुन्हेगारांची कमी नाही हे वास्तव आहे. मुंबईत दररोज अनेक गुन्हे घडत असतात. विशेष म्हणजे मुंबईत लहान मुलं सुरक्षित आहेत ना? असा प्रश्न निर्माण व्हावा, अशी घटना समोर आली आहे. सुदैवाने पोलिसांनी या प्रकरणात धडाकेबाज कारवाई केलीय. पण असे प्रकार घडू नये, अशीच अपेक्षा आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपूर्ण मुंबईत उत्साहाचं वातावरण होतं. लाडक्या बाप्पाच्या मोठमोठ्या विसर्जन मिरवणुका शहरात निघाल्या होत्या. बाप्पाच्या निरोपासाठी लाखो भाविकांचा जनसागर रस्त्यावर लोटला होता. पण याच गर्दीचा काही समाजकंटकांडून फायदा घेतला जातो. मुंबईच्या मालाड येथील मालवणी गावात हा प्रकार बघायला मिळाला. एका महिलेने गर्दीचा आणि गणपती विसर्जनाच्या कार्यक्रमाचा फायदा घेत अवघ्या दोन वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण केलं.
महिलेनं मुलाचं अपहरण केल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. चिमुकल्याच्या कुटुंबियांकडून त्याचा प्रचंड शोध सुरु झाला. परिसरातील नागरीकही चिमुकल्याचा शोध घेत होते. अखेर मुलाचा शोध लागत नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. मुलगा नेमका बेपत्ता कुठून झालाय त्याठिकाणी पोलीस गेले. पोलिसांना तपासादरम्यान खूप महत्त्वाचा पुरावा हाती लागला.
गाव देवी मंदिराजवळील राठोरी गाव येथे रवी बंटीवार हा त्याची 14 वर्षाची मुलगी आणि 2 वर्षाच्या मुलासह राहत होता. याच दोन वर्षाच्या चिमुकल्याचं महिलेने अपहरण केलं. मुलाचे वडील कामाला गेले असता महिलेने मंदिरातून मुलाचं अपहरण केलं. चिमुकल्याला बिस्किटे आणण्याच्या बहाण्याने ती दुकानात गेली आणि ती मुलाला घेऊन पळून गेली.
या दरम्यान महिला मुलीचं अपहरण करत असल्याचा प्रकार गावदेवी मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. याच गोष्टीचा पोलिसांना खूप मोठा फायदा झाला. महिला कॅमेऱ्याद कैद झाल्याने तिला बेड्या ठोकण्यात पोलिसांनी यश आलं आहे. आरोपी महिला नेमकी कोण होती, ती कुठे राहत होती, याची सविस्तर माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.
मुलाचे अपहरण झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे अवघ्या 12 तासांत आरोपी महिलेला अटक केली. पोलिसांनी आरोपी महिलेला वर्सोवा परिसरातून अटक केली. मालवणी पोलिसांनी आरोपीकडून मुलाला ताब्यात घेऊन त्याच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे. सोनम संतोष साहू असे आरोपी महिलेचे नाव आहे. ती वर्सोवा येथील रहिवासी असून तिचे सासरचे घर मालवणी येथील राठोडी गाव आहे. पोलीस याप्रकरणी सविस्तर तपास करत आहेत. महिलेने चिमुकल्याचं अपहरण का केलं? तिचा उद्देश नेमका काय होता? याता तपास पोलीस करत आहेत