पत्नीचे परपुरुषासोबत संबंध, त्याने तिच्या प्रियकराचं शीर कापलं, देहाचे तुकडे करत जाळलं, पोलिसाकडूनच निर्घृण कृत्य
मृतकाचं फक्त धड पोलिसांच्या हाती लागलं होतं त्यामुळे त्याची ओळख पटणं कठीण होऊन बसलं होतं. पण त्याच्या हातावर असलेल्या टॅट्यूच्या आधारावर पोलिसांनी मृतदेह नेमका कुणाचा आहे याची माहिती मिळवली.
मुंबई : पोलीस आपली सुरक्षा करतात. त्यांचं काम खरंच खूप गौरवास्पद असं आहे. मुंबईत तर मुंबई पोलिसांनी अनेकवेळा त्यांच्या धाडसी कामगिरीने माणुसकीचं दर्शन घडवून दिलं आहे. त्यामुळे मुंबईकर अभिमानाने मुंबई पोलिसांचं कौतुक करतात. पण याच मुंबई पोलिसात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने शरमेने मान खाली घालणारं कृत्य केलं आहे. विशेष म्हणजे तो मुंबईच्या सहायक पोलीस आयुक्तांचा ड्रायव्हर होता. पण त्याने केलेल्या कृत्यामुळे अखेर त्याला त्याच्याच सहकाऱ्यांनी बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या सायन विभागाच्या सहायक पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर 30 सप्टेंबरला शिर नसलेला जळालेला मृतदेह आढळला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. हा मृतदेह नेमका कुणाचा? हा मोठा प्रश्न पोलिसांपुढे होता. विशेष म्हणजे मृतकाचं फक्त धड पोलिसांच्या हाती लागलं होतं. त्यामुळे त्याची ओळख पटणं कठीण होऊन बसलं होतं. पण त्याच्या हातावर असलेल्या टॅट्यूच्या आधारावर पोलिसांनी मृतदेह नेमका कुणाचा आहे याची माहिती मिळवली. विशेष म्हणजे फक्त मृतकच नाहीत तर पोलीस थेट त्याच्या हत्या करणाऱ्या आरोपीपर्यंत पोहोचले.
पोलिसांनी आरोपींना कसं पकडलं?
पोलिसांनी मृतकाच्या हातावरील टॅटूच्या आधारे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर संबंधित परिसरातील मोबाईल टॉवर लोकेशनच्या आधारे ती व्यक्ती नेमकी कोण ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना दादा नावाच्या व्यक्तीचे लोकेशन आढळले. पोलिसांनी या व्यक्तीचा नंबर ट्रेस केला असता तो सोलापूरचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पण हा दादा बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी त्यानंतर या दादाच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड तपासले. तेव्हा शिवशंकर आणि मोनाली नावाच्या दोन व्यक्तींच्या तो जास्त संपर्कात असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी शिवशंकर आणि मोनाली या दोघांना ताब्यात घेतलं. यावेळी चौकशीदरम्यान आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला.
आरोपींनी हत्या का केली?
खरंतर आरोपी शिवशंकर आणि मोनाली हे पती-पत्नी आहेत. ते वरळीच्या पोलीस वसाहतीत राहतात. शिवशंकर हा मोनालीवर वारंवार अनैतिक संबंधांचा संशय घ्यायचा. त्यामुळे त्यांच्यात वारंवार वाद व्हायचा. अखेर या भांडणांना कंटाळून मोनाली मुंबई सोडून अक्कोलकोटला निघून गेली. तिथे काही दिवस राहिल्यानंतर तिची दादा जगदाळे नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली. पुढे या ओळखीचं रुपांतर मैत्री आणि प्रेमात झालं. दोघं एकत्र राहू लागले. या सर्व घडामोडीनंतर अखेर शिवशंकर आणि मोनाली यांच्यातील संबंध चांगले झाले. मोनाली मुंबईत त्याच्याजवळ राहायला आली. त्यांच्यामध्ये आता आधीसारखे फारसे वाद होत नव्हते. पण शिवशंकर आपल्या पत्नीवर पुन्हा संशय आला. पत्नीचा प्रियकर दादा जगदाळे याला शिवशंकरही ओळखत होता. त्यामुळे दादा आणि पत्नी यांच्यात संबंध असल्याचा संशय त्याला आला. त्याच संशयातून त्याने दादाचा काटा काढण्याचं ठरवलं.
शिवशंकरकडून दादाची हत्या
शिवशंकरने गोड बोलून दादा जगदाळेला मुंबईत बोलावलं. त्यानंतर त्याने मुंबईत जगदाळेची निर्घृण हत्या केली. या दरम्यान मोनालीला ददा जगदाळेच्या हत्येची माहिती मिळाली. आपल्या पतीनेच त्याची हत्या केल्याचं तिला समजलं. पण हे सगळं प्रकरण आपल्या अंगाशी यायला नको म्हणून दादा जगदाळेच्या मृतदेहाचा व्हिल्हेवाट लावण्यासाठी तिने पतीला साथ दिली. आरोपीने दादाच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्याचं शीर कापून कचऱ्यात फेकलं. तर उरलेल्या धडाचे तुकडे केले. नंतर तेच धड जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तसाच मृतदेह त्यांनी सायन येथील एसीपी कार्यालयाबाहेर फेकला. विशेष म्हणजे कुणाला संशय येऊ नये म्हणून शिवशंकर त्यादिवशी कार्यालयात ड्यूटीवरही उपस्थित राहिला. दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केलं असता त्यांना 14 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा :
टीव्ही बघणाऱ्या बायकोचा डोक्यात मुसळ घालून खून; नाशिकमधल्या घटनेत आरोपीला जन्मठेप