मुंबई : अल्पवयीन मुलीने (Minor Girl) शरीरसंबंध ठेवण्यास दिलेल्या सहमतीला कायद्याच्या दृष्टिकोनातून काहीच अर्थ नाही, असा निर्वाळा हायकोर्टाने दिला. बलात्कार (Rape) प्रकरणातील आरोपीच्या जामिनावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मत नोंदवलं. आरोपी आणि बलात्कार पीडित मुलीचे एकमेकांवर प्रेम होते. तिने आरोपीसोबत स्वत:च्या सहमतीने शरीरसंबंध ठेवले, असे मुद्दे मांडून उच्च न्यायालयात (High Court) जामीन मागण्यात आला होता. मात्र उच्च न्यायालयाने आरोपींचे मुद्दे अमान्य केले. बुलडाणा जिल्ह्यातील एका प्रकरणावर उच्च न्यायालयात युक्तिवाद सुरु होता. पीर मोहम्मद घोटू मोहम्मद इस्माईल असं आरोपीचं नाव असून नागपूर खंडपीठाने त्याला जामीन देण्यास नकार दिला आहे. आरोपीविरुद्ध अल्पवयीन मुलीवर बलात्कारासह ॲट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आरोपी आणि पीडितेचे एकमेकांवर प्रेम होते. मुलगी स्वत:हून आरोपीसोबत पळून गेली आणि तिने स्वत:च्या सहमतीने आरोपीसोबत शरीरसंबंध ठेवले, असे मुद्दे मांडत आरोपीच्या वतीने उच्च न्यायालयात जामीन मागण्यात आला होता, मात्र कोर्टाने ते मुद्दे खोडून काढले.
23 वर्षीय पीर मोहम्मद घोटू मोहम्मद इस्माईल हा मूळ उत्तर प्रदेशमधील रहिवासी आहे. सत्र न्यायालयाने ऑक्टोबर 2021 मध्ये त्याचा जामीन अर्ज नाकारल्यामुळे त्याने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.
न्यायमूर्ती विनय देशपांडे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आरोपीविरुद्ध बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बीबी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
अल्पवयीन मुलीच्या सहमतीला कायद्याच्या दृष्टिकोनातून काहीच अर्थ नाही. मुलीने तिच्या जबाबात ती आरोपीवर प्रेम करत असल्याचे कुठेही म्हटले नाही. आरोपीच तिच्यावर प्रेम करण्यासाठी दबाव टाकत होता. आरोपीने अल्पवयीन मुलीच्या धाकट्या भावाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे ती आरोपीसोबत पळून गेली. वैद्यकीय पुराव्यांवरुन आरोपीने बलात्कार केल्याचे दिसून येते. याशिवाय सरकारच्या साक्षीदारांनीही आरोपीविरुद्ध जबाब दिला आहे. त्यामुळे आरोपीला जामीन दिला जाऊ शकत नाही, असं निरीक्षण हायकोर्टाने निर्णय देताना नोंदवलं.
संबंधित बातम्या :
दोन्ही कुटुंबांच्या संमतीने विवाह ठरला, नवरदेवाला चैन पडेना, लग्नाआधीच तरुणीवर बलात्कार