मुंबई : मीरा रोड येथील सरस्वती वैद्य हत्याकांडाबाबत धक्कादायक खुलासे होत आहेत. ज्या इमारतीत सरस्वतीची हत्या करण्यात आली, त्या इमारतीच्या सातव्या मजल्यावर 35 मृतदेहाचे तुकडे सापडले आहेत. हे सर्व तुकडे सरस्वतीचेच असल्याचं फॉरेन्सिक रिपोर्टमधून स्पष्ट झालं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र, तिच्या शरीराचे काही तुकडे गायब झाले आहेत. त्याचा रिपोर्ट अजूनही आलेला नाही.
सरस्वतीच्या मृतदेहांच्या तुकड्यांचा डीएनए आणि सरस्वतीच्या बहिणीच्या डीएनएही जुळला असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मनोज साने आणि सरस्वती हे दोघे मीरा रोडच्या आकाशदीप सोसायटीतील सातव्या मजल्यावर राहत होते. त्याने सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर ते कुकरमध्ये शिजवले होते. त्याचा पोलीस तपास करत आहेत.
मनोज साने याने सरस्वतीच्या हत्येची आधीच तयारी केली होती, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. मनोजने 3 जून रोजी रात्री 10 ते 12 वाजेच्या दरम्यान त्याने सरस्वतीची हत्या केली. हे सुनियोजित हत्याकांड होतं हे स्पष्ट झालं आहे. कारण आरोपीने काही महिन्यांपूर्वीच मार्बल कटर मशीन खरेदी केली होती. त्यानंतर त्याने 4 जून रोजी झाड कापण्याची मशीनही खरेदी केली होती, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं.
मात्र, आपण सरस्वतीची हत्या केली नाही, असं त्यांच म्हणणं आहे. तो पोलिसांना वेगवेगळ्या कहाण्या ऐकवत आहे. सरस्वतीने विष घेऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे आपल्यावर आरोप येईल म्हणून घाबरल्याने तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचं त्याने पोलिसांना सांगितलंय. मात्र, त्याची कोणतीच थिअरी पोलिसांसमोर चालताना दिसत नाहीये. पोलिसांना या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत.
मनोज सानेचे अनेक महिलांशी संबंध होते. त्याच्या फोनमध्ये अनेक महिलांशी त्याने केलेल्या चॅटिंग हाती आल्या आहेत. आरोपीच्या मोबाईलमध्ये डेटिंग अॅप्सही मिळाले आहेत. तो अनेक डेटिंग अॅप्सवर अॅक्टिव्ह होता. या अॅपद्वारे तो महिलांशी चॅट करत होता. पोलीस आता हा रेकॉर्ड काढत आहेत. मनोजला एड्स होता. त्याचे सरस्वतीसोबत शारीरिक संबंध नव्हते. मात्र, तो सेक्स अॅडिक्ट होता, अशी माहितीही समोर आली आहे.
मनोज सानेने सरस्वतीला किटकनाशक देऊन मारल्याचं सांगितलं जात आहे. गुन्हा घडण्यापूर्वी त्याने बोरिवली पश्चिमेकडील एका दुकानातून किटकनाशक खरेदी केलं होतं. ही हत्या 3 जून नव्हे तर 4 जूनला झाली असावी असा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी पोलिसांनी मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलिसांनी 20 लोकांची साक्ष नोंदवली आहे.