मुंबई विमानतळाच्या पार्किंगमध्ये हिट अँड रन… पाच जण जखमी, काय घडलं?
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्किंगमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे. मर्सिडीज गाडीने धडक दिल्याने पाच जण जखमी झाले आहेत, त्यात दोन परदेशी नागरिक आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्किंगमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या हिट अँड रनमध्ये पाच जण जखमी झाले आहेत. यातील दोन जण परदेशी प्रवासी आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अधिक माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. याबाबतचा पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र, या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल-2 येथील पार्किंगमध्ये आज सकाळी 9.30च्या सुमारास ही घटना घडली. प्रवाशाला सोडण्यासाठी आलेल्या मर्सिडिज गाडीने धडक दिल्याने अपघात झाला. मर्सिडिजच्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असून त्यात 5 जण जखमी झाले आहेत. या पाच जखमींपैकी दोघे झेक रिपब्लिक या देशातील नागरिक आहेत. तर इतर तिघे विमानतळावरील क्रू मेंबर आहेत. या जखमी परदेशी नागरिकांना तात्काळ नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर क्रू मेंबरना कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या पाचही जणांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.
सहार पोलिसात गुन्हा दाखल
आज सकाळी हा अपघात घडला. एक मर्सिडिज दुपारी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्किंगमध्ये आली होती. नवी मुंबईतील एका हॉटेलमधून प्रवाशाला घेऊन मर्सिडिज आली होती. पण गेट नं-1 जवळ आल्यावर स्पीड ब्रेकरवरील नियंत्रण सुटल्याने चालकाने ब्रेक मारण्याऐवजी अॅक्सिलेटर जोरात दाबले. त्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे त्याने समोरच्या वाहनाला धडक दिली. यावेळी त्याच्या गाडीसमोर आलेले पाचजण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गाडीचा चालक आणि गाडी ताब्यात घेतली आहे. या गाडी चालकावर सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
अन् दुर्घटना टळली
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्किंगमध्ये नेहमी वर्दळ असते. आज रविवार असल्याने आणि सकाळची वेळ असल्याने या ठिकाणी वर्दळ कमी होती. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली नाही. वर्किंग डे असता तर या ठिकाणी मोठी अनुचित घटना घडली असती, असं सांगितलं जात आहे.
CSMIA याची प्रतिक्रिया काय?
आज सकाळी CSMIA मध्ये, T2 च्या डिपार्चर लेनमध्ये एका चालकाचा गाडीवरील ताबा सुटला, ज्यामुळे पाच जण जखमी झाले. विमानतळावरील वैद्यकीय पथकाने तातडीने प्राथमिक उपचार देण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमींना लगेचच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रवाशांची सुरक्षितता आणि ऑपरेशन सुरू ठेवण्यासाठी CSMIA पोलिस आणि इतर पथकांसोबत काम करत आहे, अशी माहिती CSMIAच्या प्रवक्त्याने दिली आहे.