मुंबई : मुंबईच्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर लुटमार (Western express Highway) करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी (Mumbai Police) मुसक्या आवळल्या आहेत. एका कारमधून यायचं. एकट्याने कारने जाणाऱ्या माणसाला हेरायचं. त्याच्या गाडीला ओव्हरटेक करायचा आणि त्याला लुटायचं, असा प्रकार एक टोळी करत होती. याप्रकरणी पोलिसांनी (Mumbai Crime News) मोठी कारवाई करत अखेर चौघांना गजाआड केलंय. कस्तुरबा पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली. कस्तुरबा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड यांनी या लुटमार करणाऱ्या दरोडेखोरांबाबत अधिक माहिती दिली. मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर लुटमार झाल्याच्या एका घटनेची तक्रार पोलिसांकडे आली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत चौघांना अटक केली. मुंबईच्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर केल्या जाणाऱ्या या लुटमारीची ही घटना उघडकीस आल्यानंतर आता अशा अनेक टोळ्या मुंबईत सक्रिय तर नाहीत ना, अशीदेखील शंका घेतली जातेय.
लुटमार करण्याच्या उद्देशाने दरोडेखोर ओला कामध्ये फिरायचे. ओला कारमध्ये फिरुन वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेरुन एकट्याने जाणाऱ्या कारला ओव्हरटेक करायचे. त्यानंतर कार थांबवायला लावून मौल्यवान मोबाईल फोन, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू सोबत ठेवणाऱ्याला लुटायचे. नुकतेच या टोळीने सोन्याचे दागिने लुटून पळ काढला होता.
25 मे रोजी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील मेट्रो मॉलजवळ दरोडेखोरांनी एका व्यक्तीची सोनसाखळी आणि आयफोन 13 प्रो हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली होती. गुन्हा दाखल केल्यानंतर कस्तुरबा मार्ग पोलिसांनी तपास सुरू करून चार आरोपींना मीरा भाईंदर येथून अटक केली.
आरोपीविरुद्ध काशिमीरा पोलिस ठाण्यात दंगल आणि एनडीपीएसचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवतात आणि महामार्गावर एकटे जाणाऱ्या लोकांचा पाठलाग करतात, त्यानंतर महामार्गावरील निर्जन ठिकाणी ओव्हरटेक करून कार थांबवतात आणि लुटून पळून जातात, असा आरोप करण्यात आलाय.
पोलिसांनी आरोपींकडून आयफोन 13 प्रो आणि 20 ग्रॅम सोन्याची चेन जप्त केली असून दरोड्यात वापरलेली ओला कारही जप्त केली आहे. सध्या अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींची कसून चौकशी केली जात असल्याची माहिती कस्तुरबा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक अनिल आव्हाड यांनी दिलीय.