मुंबई / 4 ऑगस्ट 2023 : मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर दोन तरुणांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. तरुणांकडे सापडलेल्या आधारकार्डवरुन तरुणांची ओळख पटली आहे. दीपक बिश्त (वय 25) आणि हरदेव सिंग (वय 26) अशी मयत तरुणांची नावे आहेत. दोघेही तरुण मूळचे हरियाणातील रहिवासी आहेत. मात्र तरुणांचा मृत्यू नेमका कसा झाला? याबाबत अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. वर्सोवा पोलीस एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करून संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तरुणांचा अपघाती मृत्यू झाला की त्यांची हत्या झाली हे स्पष्ट होईल. पोलीस नातेवाईकांची चौकशी करत आहेत.
वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर दोन तरुणांचे मृतदेह असल्याची माहिती लाईफ गार्डने काल सायंकाळी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. दोन्ही मृतदेह 100 मीटरच्या अंतरावर पडले होते. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. तरुणांच्या खिशात त्यांचे आधारकार्ड आणि सिम कार्ड सापडले. त्यावरुन त्यांची ओळख पटली आणि ते हरियाणातील असल्याचे कळले. पोलिसांनी सिम कार्डमधील नंबरवरुन त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला.
कुटुंबीयांशी संपर्क साधला असता दोघेही तरुण नागपूर आणि चेन्नई येथे कामाला असल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली. मग तरुण मुंबईत कसे आले? याबाबत पोलीस तपास करत आहेत. तरुणांच्या शरीरावर कुठल्याही प्रकारच्या जखमी दिसत नाहीत. यामुळे तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला की त्यांचा घातपात झाला? याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे. शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासानंतर सर्व स्पष्ट होईल.