मुंबई : मुंबई पोलिसांनी मोठी आणि महत्त्वाची कामगिरी केली आहे. मध्यरात्री फुटपाथवर एका आईजवळ झोपलेल्या दोन महिन्याच्या मुलीचं एका आरोपीने अपहरण केलं होतं. आईला आणि कुटुंबातील इतर सदस्यांना याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांचे सात गेले आणि पाच राहिले. त्यांनी आधी आपल्या लेकीला शोधण्याचा प्रचंड प्रयत्न केला. पण मुलगी मिळत नसल्याने त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखत तातडीने कारवाई सुरु केली. यासाठी पोलिसांनी शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले. अखेर मुलीचं अपहरण करणारा नराधम एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आढळला. त्यामुळे पोलिसांचं काम सोपं झालं. पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवली आणि आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
संबंधित घटना ही मुंबईतील प्रचंड रहदारी असलेल्या आझाद मैदान परिसरात घडली. आझाद मैदान परिसरात सेंट जेवियर्स हायस्कूलच्या समोर फुटपाथवर बुधवारी (26 ऑक्टोबर) एक कुटुंब झोपलं होतं. याच दरम्यान रात्री तीन वाजेच्या सुमारास हे कुटुंब गाढ झोपेत असताना एक नराधम फुटपाथवर आला. त्याने कुटुंबातील सर्वजण झोपले आहेत ना, याची शहानिशा केली. त्यानंतर योग्य संधी साधत आईजवळ झोपलेली दोन महिन्याची मुलगी पळवून नेली.
आरोपीने बाळ पळवून नेल्यानंतर पहाटे तिचे आई-वडील उठले तेव्हा आपली मुलगी नेमकी कुठे गेली या विचारात ते पडले. त्यांनी मुलीला शोधण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान कुटुंबातील इतर सदस्य देखील जागी झाले. त्यांनी मुलीचा शोध सुरु केला.
मुलगी आजूबाजूला कुठेच मिळत नसल्याने आई-वडिलांना आपल्या मुलीचं अपहरण झाल्याचा संशय आला. संबंधित कुटुंबाने आझाद नगर पोलीस ठाण्याच्या कंट्रोल रुमला याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने तपासाला सुरुवात केली.
पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या नेमक्या कशा आवळल्या?
पोलिसांनी मुलीच्या शोधासाठी तातडीने आठ पथकं तैनात केली. या टीमने आझाद नगर मैदान परिसरातील गल्लोगल्ली पिंजून काढल्या. यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले. पोलिसांनी मुलीच्या शोधासाठी शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले. अखेर एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये अपहरणकर्ता मुलीला घेऊन जाताना दिसला आणि पोलिसांच्या तपासाला अर्ध यश आलं. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपीचा पाठलाग केला. तसं शोधत-शोधत आझाद मैदान पोलिसांची टीम वडाळा येथील संगम नगरपर्यंत पोहोचली. अखेर तिथे तपास केला असता पोलिसांना आरोपींचा त्याठिकाणचा पत्ता मिळाला. त्यानंतर लगेच पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. विशेष म्हणजे पोलिसांनी अवघ्या दहा तासात ही सर्व कारवाई केली. त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईचं कौतुक होत आहे.
आझाद मैदान पोलिसांनी आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास मुलीला आरोपींच्या ताब्यातून घेतलं. त्यानंतर मुख्य आरोपीसह त्याच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली. पोलिसांनी या दरम्यान आणखी एका संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपींवर कलम 363 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुलीला आता कुटुंबियांच्या स्वाधीन केलं आहे.
आरोपी कीटकनाशकं विकायचा
पोलिसांनी तपास केला असता आरोपी विषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या कारवाई विषयी माहिती दिली. या घटनेतील मुख्य आरोपीचं नाव मोहम्मद हनीफ शेख असं आहे. तो आधी मीरा रोडला वास्तव्यास होता. पण काही दिवसांआधी तो मुंबई सेंट्रल येथे राहायला आला. तो आधी कीटकनाशकं विकायचं काम करायचा, अशी माहिती विवेक फणसाळकर यांनी दिली. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.