मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर अपघात! घाट उतरताना अनर्थ, 100 फूट खोल दरीत कोसळला कंटेनर
मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा मोठा अपघात! 3 ते 4 वाहनं विचित्र पद्धतीने धडकली, एक ठार
रायगड : मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर बोरघाटात भीषण अपघात झाला. एक कंटेनर ट्रक 100 फूट खोल दरीत कोसळला. तर दुसऱ्या एका ट्रकचं केबिनलाही फटका बसला. या ट्रकचं केबिनच मागे असलेल्या मालवाहू सामानासह वेगळं झालं होतं. या भीषण अपघातात 3 ते 4 वाहनं विचित्रपणे एकमेकांना धडकल्याची माहिती मिळतेय. या अपघातानंतर महामार्ग पोलिसांकडून रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे. भीषण अपघातात एक जण ठार झाला आहे. तर एकाला वाचवण्यासाठी बचावकार्य केलं जातंय.
खोपोली जवळ बोरघाट उतरताना मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर हा अपघात घडला. या अपघातात तीन ते चार वाहनांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर 100 फूट खोल दरीत कोसळलेल्या कंटेनरमध्ये चालकही अडकला. या चालकाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
एक कंटेनर आणि आणखी ट्रकच्या चालकाची कॅबिनदेखील दरीत कोसळली आहे. या अपघातात ट्रक आणि कंटेनरमधील सामानाचं मोठं नुकसान झालं आहे. अपघातग्रस्त कंटेनरमध्ये कांदे आणि घरगुती भांड्यांचं सामान होतं. या सामानाही अपघातात फटका बसलाय.
या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस, देवदूत यंत्रणा अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी दाखल झाली असून बचावकार्य केलं जातंय. या अपघातानंतर क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनांचं रेस्क्यू करण्यात आलं. तसंच महामार्गावरील वाहतुकीवर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांकडूनही विशेष काळजी घेण्यात आली.
मुंबई पुणे एक्स्प्रेस हायववेर याआधीही नुकताच पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला होता. त्यानंतर आता पुन्हा झालेल्या ट्रक आणि कंटेनरच्या अपघाताची एक्स्प्रेस वेवरील वाहनांच्या शिस्तीबाबत शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे.
नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर 140 पेक्षा अधिक अपघातांची नोंद ही 2022 या वर्षांच्या पहिल्या 9 महिन्यातच करण्यात आली आहे. त्यातील बहुतांश अपघात हे लेन कटिंगमुळे होत असल्याचंही निदर्शनास आलं होतं.