मुंबई : मुंबईच्या साकीनाका परिसरात एका 32 वर्षीय महिलेवर अमानुषपणे बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आलीय. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या शहरात महिलेवर अशाप्रकारे अत्याचार होत असतील तर इतर शहरांमधील परिस्थितीत काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. संबंधित प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांच्या हाती काही पुरावे लागले आहे. पोलिसांना संबंधित परिसरात काही सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आरोपीचे दुष्कृत्य कैद झालं आहे. रात्रीच्या अंधारामुळे सीसीटीव्हीत फारसं स्पष्ट दिसत नाहीय. पण परिसरात संशयास्पद घटना घडतेय, ते स्पष्टपणे जाणवत आहे.
मंबईच्या साकीनाका परिसरात एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली. आरोपीने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचं संतापजनक आणि अमानुष कृत्य केलं. एका टेम्पोत हा सगळा प्रकार करण्यात आला. या घटनेमुळे स्थानिकांकडून रोष व्यक्त केला जातोय. संबंधित घटना ही गुरुवारी मध्यरात्री (9 सप्टेंबर) तीन वाजेच्या सुमारास घडली.
पीडित महिलेची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. ती अद्यापही बेशुद्ध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तिच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिच्या प्रकृतीसाठी डॉक्टर मोठ्या शर्थीने प्रयत्न करत आहेत. या प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.
साकीनाका खैरानी रोड येथे काल रात्री तीनच्या सुमारास कंट्रोल रुमला एका महिलेला मारहाण होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार साकीनाका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी ती गंभीररीत्या जखमी असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, या घटनेवर विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रोष व्यक्त केला आहे. “मुंबईतील साकीनाका भागात निर्भयासारखी घटना ऐकून मन सुन्न झाले. कलम 144 फक्त गणेशभक्तांसाठीच का? वाढते महिला अत्याचार थांबविण्यासाठी कोणते कलम आणि केव्हा लावणार?”, असे सवाल फडणवीस यांनी उपस्थित केले आहेत. तसेच दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी, असं देखील ते म्हणाले.
मुंबईतील साकीनाका भागात निर्भयासारखी घटना ऐकून मन सुन्न झाले❗️
कलम 144 फक्त गणेशभक्तांसाठीच का?
वाढते महिला अत्याचार थांबविण्यासाठी कोणते कलम आणि केव्हा लावणार❓
दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी❗️#Mumbai https://t.co/iLq7SvBoCh— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 10, 2021
संबंधित बातमी : मुंबईच्या साकिनाका परिसरात 32 वर्षीय महिलेवर बलात्कार, पीडितेच्या गुप्तांगावर वार, संतापजनक घटना