मुंबई : लालबाग सारख्या मराठमोळ्या परिसरात अत्यंत भयानक आणि अविश्वसनीय घटना घडलीय. लालबागच्या एका चाळीतील हत्येचा मोठा खुलासा झाला आहे. आई बाथरूममध्ये पडली. त्यानंतर दोन दिवसानंतर तिचा मृत्यू झाला. त्यामुळे सख्ख्या मुलीने आईच्या मृतदेहाचे पाच तुकडे केले. शेजारीच राहणाऱ्या चाजनीज रेस्टॉरंटमधील दोन वेटरच्या मदतीने तिने आईच्या मृतदेहाचे तुकडे करून मृतदेह कपाटात ठेवला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मुलीचं हे हैवानी कृत्य पाहून लालबागकरांना मोठा धक्का बसला आहे.
मी खूप घाबरले होते. घाबरल्यामुळे मी आईच्या मृतदेहाचे पाच तुकडे केले, अशी कबुली या मुलीने दिलीने दिली आहे. पण पोलिसांना या मुलीच्या कबुलीवर विश्वास नाहीये. हे कृत्य करण्यामागे मुलीचा हेतू काय होताहे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणात साथ देणाऱ्या त्या दोन वेटरचा पोलीस शोध घेत आहेत. हे वेटर आपल्या गावी पसार झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांची एक टीम या दोन्ही वेटरला शोधण्यासाठी गावाकडे रवाना झाली आहे.
पोलिसांनी या तरुणीला अटक केली आहे. रिंपल जैन असं या मुलीचं नाव आहे. आईची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे पाच तुकडे केल्याचा तिच्यावर आरोप आहे. आईच्या मृतदेहाचे पाच तुकडे करून ते पॉलिथीनच्या पिशवीत भरून कपाटात ठेवले. काही तुकडे पाण्याच्या ड्रममध्ये ठेवले. अडीच महिन्यापूर्वी ही हत्या करण्यात आली. पोलिसांनी रिंपलला अटक केल्यानंतर तिने पोलिसांना जे सागितलं ते धक्कादायक होतं. आई बाथरूममध्ये जात असताना पडली. त्यामुळे तिला मार लागला आणि 26 डिसेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. आईचा मृत्यू झाल्याने मी घाबरून गेले होते. घाबरल्याने मी मृतदेहाचे तुकडे केले, असं तिने पोलिसांनासांगितलं. पण पोलिसांना तिच्या म्हणण्यात तथ्य वाटत नाहीये.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्बल कटरने तिने तिच्या आईच्या मृतदेहाचे पाच तुकडे केले होते. हे काम ती एकटं करू शकत नव्हती. त्यामुळे तिने शेजारी राहत असलेल्या दोन वेटरांना बोलावलं. त्यांना अमिष दाखवलं आणि त्यांच्यासोबत मिळून आईच्या मृतदेहाचे पाच तुकडे केले. हे दोन्ही वेटर फरार झाले आहेत. त्यांना शोधण्यासाठी पोलिसांचं एक पथक पश्चिम बंगालला गेलं आहे. तर दुसरं पथक उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये गेलं आहे.
पोलिसांनी रिंपलच्या मोबाईलमधील व्हॉट्सअप चॅट हस्तगत केले आहे. या दोन्ही वेटरसोबतचं संभाषण या चॅटमध्ये आहे. त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत. हे चॅट पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचे पुरावे असल्याचं मानलं जात आहे. तसेच रिंपलला सध्या 20 मार्चपर्यंत रिमांडमध्ये घेतलं आहे. मृत महिलेचा शवविच्छेदन अहवाल आला आहे. या मृत महिलेची हत्या अत्यंत क्रूरपणे करण्यात आल्याचं त्यात नमूद करण्यात आलं आहे. या मृत महिलेला मृत्यूपूर्वी प्रचंड टॉर्चर केल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर तिच्या मृत्यूनंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. फोरेन्सिक एक्सपर्ट डॉ. राजेश डेरे यांच्या मतानुसार ही हत्याच आहे.
रिंपल वारंवार एकच कहाणी पोलिसांना सांगत आहे. आई टॉयलेटला जात असताना पायऱ्यांवरून घसरली. त्यामुळे ती जखमी झाली. त्यामुळे मी शेजारील दोन तरुणांना बोलावलं आणि आईला घरी घेऊन आले. मात्र, जबर मार लागल्याने काही तासातच तिचा मृत्यू झाला. त्यामुळे मी घाबरले आणि दोन दिवसानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्याचा मी निर्णय घेतला, असं ती म्हणतेय. पण पोलिसांना तिच्या म्हणण्यावर काडीचाही विश्वास नाही. ही निव्वळ बचावासाठीची थाप आहे. नवी कहाणी रचलेली आहे, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं.