‘त्या’ 3 दिवसांत काय घडलं? यशश्री हत्या प्रकरणात नवी अपडेट, डीसीपींनी सांगितला घटनाक्रम
यशश्री शिंदे हत्या प्रकरणी आता पोलिसांच्या तपासात आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आरोपी हत्येच्या तीन दिवस आधी नवी मुंबईत आला होता. या तीन दिवसांमध्ये काय-काय घडलं याची माहिती नवी मुंबई क्राईम ब्रांचचे डीसीपी अमित काळे यांनी दिली आहे.
रायगड जिल्ह्यातील उरण येथील यशश्री शिंदे हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरलं आहे. या घटनेवर उरणसह राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे. नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली आहे. आरोपी दाऊद शेख यानेच यशश्रीची हत्या केल्याचं उघड झालं आहे. आरोपीने आपला गुन्हादेखील कबूल केला आहे. आरोपीने यशश्रीची हत्या का केली? याचा तपास पोलीस करत आहेत. पोलीस या प्रकरणी सविस्तर आणि सखोल तपास करत आहेत. याच प्रकरणी आता पोलिसांच्या तपासात आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आरोपी हत्येच्या तीन दिवस आधी नवी मुंबईत आला होता. या तीन दिवसांमध्ये काय-काय घडलं याची माहिती नवी मुंबई क्राईम ब्रांचचे डीसीपी अमित काळे यांनी दिली आहे.
तीन दिवसांत काय-काय घडलं? डीसीपींकडून महत्त्वाची माहिती
“यशश्री शिंदे हिच्या हत्येची घटना २५ जुलैला घडली होती. याप्रकरणी २७ तारखेला हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर वेगवेगळी पथक तयार करण्यात आली होती. संशयित आरोपी निश्चित करण्यात आला आणि शोध सुरु केला होता. दाऊद शेख याला गुलबर्गा येथून अटक करुन आणलं आणि कोर्टात हजर करण्यात आलं होतं. आरोपीला ७ दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी घटनेच्या आधी २२ तारखेला इथे आला. हत्येच्या एक दिवस आधी २४ तारखेलाही आरोपी पुन्हा यशश्रीला भेटला होता. त्याने यशश्रीला २५ तारखेला दुपारपर्यंत भेटण्यासाठी तगादा लावला होता. यानंतर त्याने २५ तारखेला त्याच्याकडे असणाऱ्या चाकूने यशश्रीची हत्या केली”, असा घटनाक्रम अमित काळे यांनी सांगितला.
“आरोपी लग्नासाठी पीडितेकडे तगदा लावत होता. तसेच बंगळुरू किंवा कर्नाटकात माझ्यासोबत राहायला चल, असे म्हणत होता. त्याला मुलीचा विरोध होता. आरोपीचे लग्न झालेले नव्हते. आरोपी आणि पीडित एकाच वर्गात शिकत होते. पण दहावीनंतर आरोपीने शिक्षण सोडले. पॉक्सोचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी अटकेत होता. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर आरोपी कर्नाटकात गेला. पण मधल्या काळात एक-दोन वेळा येऊन गेला असल्याचं समोर आलंय”, असं डीसीपींनी सांगितलं
याआधी डीसीपींनी काय प्रतिक्रिया दिलेली?
नवी मुंबई क्राईम ब्रांचचे डीसीपी अमित काळे यांनी आरोपीला अटक केल्यानंतर या प्रकरणावर सविस्तर प्रतिक्रिया दिली होती. “25 जुलैला वीस वर्षीय तरुणीची उरणमध्ये हत्या झालेली होती आणि त्यानंतर आरोपी फरार होता. तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून अखेर कर्नाटकच्या एका हिल लाईन भागातून आम्ही आरोपीला अटक केली आहे. त्याला नवी मुंबईमध्ये आणलं आहे. आरोपी दाऊद शेख यानेच चाकूने वार करून हत्या केल्याचं आत्तापर्यंतच्या तपासामध्ये निष्पन्न झालं आहे. हत्येच कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. आरोपीच्या चौकशीमध्ये याचा खुलासा होईल”, अशी माहिती डीसीपी अमित काळे यांनी काल दिली होती.
आरोपी दाऊद शेख आणि त्याचा लहानपणीचा मित्र मोहसीन हे दोघेही मृत आणि पीडिता यशश्री शिंदे हिच्या संपर्कात होते. आरोपीला पळून जाण्यासाठी किंवा आसरा देणाऱ्यामध्ये कोणी कोणी मदत केलेली आहे, त्यांना गुन्ह्याची कल्पना होती का, याची माहिती घेतली जात आहे. आरोपीने चाकूने भोसकल्यानंतर चेहऱ्याला इजा केली नसल्याचं प्राथमिक चौकशीत समोर येत आहे. पीडितेचा चेहरा हा जंगली जनावर किंवा कुत्र्यांनी ओरबडल्यामुळे तो छिन्नविछिन्न झाला असावा अशी शक्यता आहे. आरोपी आणि पीडिता हे मागच्या काही काळापासून संपर्कात होते”, अशी माहिती डीसीपी अमित काळे यांनी दिली आहे.
आरोपीला हत्येच्या 5 दिवस आधीच कोर्टाने बजावलेलं वॉरंट
उरण यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील आणखी महत्त्वाची माहिती म्हणजे आरोपी दाऊद शेख विरोधात हत्येच्या ५ दिवस आधी कोर्टाने अजामीनपत्र वॉरंट जारी केलं होतं. आरोपी दाऊद शेख विरोधात २० जुलैला पॉक्सोच्या गुन्ह्यात वॉरंट जारी करण्यात आलं होतं. वॉरंट जारी झाल्यानंतर ५ दिवसातच आरोपीने पीडितेची हत्या केली. पीडितेच्या वडिलांनी आरोपीविरोधात २०१९ मध्ये पॉक्सोचा गुन्हा दाखल केला होता. त्यात ते वॉरंट जारी करण्यात आलं होतं. कोर्टाकडून आरोपीला १२ ऑगस्टला कोर्टात हजर राहण्याच्या होत्या सूचना देण्यात आल्या होत्या. जुन्या प्रकरणात आरोपी कित्येक दिवस हजर राहत नसल्याचे कोर्टाचे निरीक्षण होते.
कोर्टात काय घडलं?
पोलिसांनी आरोपीच्या १० दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र कोर्टाने आरोपीला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी कोर्टात दिली महत्त्वपूर्ण माहिती दिली. आरोपी दाऊद शेखने यशश्रीच्या हत्येची कबुली दिली आहे. दाऊद शेखनेच हत्या केल्याचं चौकशीत मान्य केल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितल. मात्र हत्येचं कारण आरोपी सांगत नसल्याने त्याचा तपास करणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद पोलिसांनी कोर्टात केला. आरोपीकडून हत्येचा उद्देश काय हे समजून घेणे आवश्यक असून त्यासाठी जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळावी यासाठी १० दिवसाच्या कोठडीची मागणी पोलिसांनी केली होती.
पनवेल सत्र न्यायालयाने आरोपी दाऊद शेखला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीचे यशश्री शिंदेसोबत काय नातं होतं? याची माहिती घ्यायची आहे, असं पोलिसांनी कोर्टात सांगितलं. आरोपी हत्येनंतर कर्नाटकात फरार झाला होता. मात्र यादरम्यान त्याला कोणी मदत केली आहे का? याचा तपास करायचा असल्याचे पोलिसांनी कोर्टात सांगितले आहे. गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद नवी मुंबई पोलिसांनी कोर्टात केला.