एनीसीबीचं दिल्लीतून आलेलं पथक कामाला लागलं, समीर वानखेडेंचा जबाब नोंदवण्यास सुरुवात, कथित 25 कोटी डीलचं खरं-खोटं बाहेर पडणार
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील साक्षीदार किंवा पंच असलेले प्रभाकर साईल यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर यांच्यासह के पी गोसावी यांच्याबाबत केलेल्या 25 कोटींच्या डील प्रकरणावरुन एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील साक्षीदार किंवा पंच असलेले प्रभाकर साईल यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर यांच्यासह पंच के पी गोसावी यांच्याबाबत केलेल्या 25 कोटींच्या डील प्रकरणावरुन एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या आरोपांना आता एनसीबीच्या उच्च स्तरीय अधिकाऱ्यांकडून गांभीर्याने दखल घेतली गेली आहे. या आरोपांमधील नेमकं खरं-खोटं काय हे तपासण्यासाठी एनसीबीचं एक पथक दिल्लीतून मुंबईत दाखल झालं आहे. यामध्ये एनसीबीचे डेप्यूटी डीजी ज्ञानेश्वर सिंह यांच्यासह पाच सदस्यीस समितीचा समावेश आहे. हे पथक आज सकाळी मुंबईत दाखल झालं असून तपासाला सुरुवात झाली आहे. या पथकाकडून सध्या वानखेडे यांचा जबाब नोंदवला जात आहे, अशी माहिती स्वत: एनसीबीचे डेप्यूटी डीजी ज्ञानेश्वर सिंह यांनी दिली आहे.
ज्ञानेश्वर सिंह नेमकं काय म्हणाले?
“आम्ही मुंबईत आलो आहोत. मुंबईतील एनसीबीच्या कार्यालयातून काही कागदपत्रे गोळा करण्यात आले आहेत. साक्षीदारांना बोलवण्यात आलं आहे. या चौकशीबाबत सध्या रिअलटाईम माहिती आपल्याला देणं कठीण आहे. कारण हे एक संवेदनशील प्रकरण आहे. या प्रकरणाशी संबंधित सगळी माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. समीर वानखेडे यांचा जबाब नोंदवला जातोय. चौकशी सुरु आहे. चौकशी पूर्ण झाल्यावर आम्ही ज्या निष्कर्षावर येऊ ती माहिती आपल्याला दिली जाईल”, अशी प्रतिक्रिया एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी दिली.
समीर वानखेडे दिल्लीला जावून आले
या प्रकरणात ज्या घडामोडी घडत आहेत त्या वेगवेगळ्या स्तरावर अत्यंत वेगाने घडताना दिसत आहेत. एकीकडे समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप पंचाकडून केले गेले. त्यानंतर समीर वानखेडे रविवारी (25 ऑक्टोबर) दिल्लीला गेले. त्यानंतर ते पुन्हा मुंबईत दाखल झाले. त्यानंतर एनसीबीची पाच सदस्यीय समिती वानखेडेंवरील आरोपांची चौकशी करण्यासाठी मुंबईत दाखल झालीय. त्यांनी सर्वात आधी वानखेडे यांचा जबाब नोंदवलाय. याशिवाय ते इतर साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याच्या तयार आहेत. या घडामोडी घडत असताना नवी मुंबईतल काही दिवसांपूर्वी एनसीबीने केलेल्या कारवाईत पंच असलेल्या दुसऱ्या आणखी एकाने समीर वानखेडे यांच्याविरोधात वक्तव्य केलंय. समीर वानखेडे यांनी आपल्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या होत्या, असा दावा या पंचाने केला आहे.
तिसरीकडे मंत्री नवाब मलिकांचे गंभीर आरोप
एकीकडे पंचाने केलेल्या आरोपांमुळे चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले समीर वानखेडे यांच्यावर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याकडून सातत्याने गंभीर आरोप होत आहेत. त्यांनी तर थेट वानखेडे यांनी खोट्या जातीच्या कागदपत्रांच्या आधारावर नोकरी मिळवली, असा आरोप केला आहे. त्यासाठी मलिक यांनी समीर यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये समीर यांच्या पहिल्या लग्नाचा फोटो, त्या संबंधित कागदपत्रे शेअर केली आहेत. तसेच वानखेडे यांचा पहिला निकाह लावणारे मुल्ला यांनीदेखील वानखेडे मुस्लिम असल्याचा दावा केलाय. त्यांनी आपल्याला तशी माहिती दिली म्हणूनच आपण त्यांचं लग्न लावून दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या :
समीर वानखेडेंची चौकशी, साक्षीदाराचे आरोप; ज्येष्ठ वकील उज्जवल निकम म्हणतात…
समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार? एनसीबीविरोधात अजून एक पंच समोर, कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचा दावा