नवी मुंबई | 14 ऑक्टोबर 2023 : नवी मुंबईत एका हॉटेलमध्ये शहरातील एका पक्षाच्या नेत्याची गुंडगिरी समोर आलीय. या हॉटेलमध्ये लेट नाईट पार्टी सुरु होती. यावेळी रंगेबिरंगी लाईट्सचा झगमगाट होता. गाण्यांचा आवाज सुरु होता. अनेक तरुण नशेत नाचत होते. ही हॉटेल म्हणजे एक पबच आहे, अशी माहिती मिळत आहे. इथे नियमितपणे लेट नाईट पार्टी सुरु असते. या पार्ट्यांना गुन्हेगार देखील येतात. रात्री उशिरापर्यंत हा पब चालू असतो. त्यामुळे गुन्हेगारीमध्ये प्रचंड वाढ झालीय. असं असतानाच आता एका नेत्याच्या भावाने पिस्तूल दाखवत हॉटेल कर्मचाऱ्याला दमदाटी केल्याचा प्रकार समोर आलाय. संबंधित प्रकार सीसीटीव्हीत अतिशय अचूकपणे कैद झालाय.
नवी मुंबईतील पाम बीच गॅलरीया मॉलमध्ये सेवेन्थ स्काय हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये संबंधित प्रकार समोर आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अन्नू आंग्रे याच्या भावाची गुंडगिरी समोर आलीय. राहुल आंग्रे याने चक्क पिस्तूल दाखवून हॉटेल कर्मचाऱ्यांना धमकी दिली. त्याने दमदाटी करत खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
राहुल आंग्रे याच्यासोबत असणाऱ्या साथीदारांनी देखील हॉटेलची तोडफोड करत उन्माद घातला. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच एका आरोपीला अटक करण्यात आलीय.या घटनेचा सीसीटीव्ही आता समोर आलाय. पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.
आतापर्यंत एपीएमसी पोलिसांनी तीन वेळा उत्पादन शुल्क विभाग आणि नवी मुंबई महानगरपालिकेस पत्र लिहून सेवन्थ स्काय हॉटेलचा परवाना रद्द करण्याची मागणी केलीय. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पहाटेपर्यंत चालणाऱ्या अशा पबमुळे गुन्हेगारीला खतपाणी मिळत आहे.