PFI विरोधी कारवाई सुरुच! आता पनवेल आणि औरंगाबादमधून समोर आली मोठी अपडेट
PFI वर बंदी घातल्यानंतर कुरघोड्या सुरुच? ATSची पनवेलमध्ये मोठी कारवाई, तर औरंगाबादेतून कुणाला अटक?
रवी खरात आणि दत्ता कानवटेसह ब्यरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई : रायगड जिल्ह्यातील पनवेलसह औरंगाबादेत पीएफआयविरोधी (PFI) मोठी कारवाई करण्यात आलीय. पनवेलमध्ये पीएफआय राज्य विस्तार समिती सदस्य आणि पीएफआय सचिव यांच्यासह अन्य दोघा जणांना अटक करण्यात आली. एटीएसने (ATS) छापा टाकून एकूण चार जणांना अटक केली. केंद्र सरकारने पीएफआयवर बंदी (PFI Banned) घातल्यानंतर त्यांच्या कुरघोड्या सुरुच असल्याचं या कारवाईमुळे आता समोर आलंय. अटक करण्यात आलेल्या सर्वांवर यूएपीए अंतर्गत कारवाई करण्यात आलीय. आज या सर्वांना पनवेल न्यायालयात रिमांडसाठी हजर करण्यात येणार आहे.
कुरघोड्या सुरुच?
पीएफआयशी संबंधित हे सर्व लोक पनवेलमध्ये गुप्त बैठका घेत असल्याची माहिती समोर आली होती. या बैठकीतून पीएफआयशी संबंधित या लोकांकडून रणनिती आखली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. त्यातून एटीएसने छापा टाकून चौघांवर अटकेची कारवाई केलीय.
औरंगाबादमध्येही कारवाई
दुसरीकडे पीएफआयच्या तीन राज्यांच्या समन्वयकाला औरंगाबादेत अटक करण्यात आलीय. मध्यप्रदेश पोलिसांनी औरंगाबादेत येऊन अटकेची कारवाई केली. नासिर नदवी असं अटक केलेल्या समन्वयकाचे नाव आहे. महाराष्ट्र मध्यप्रदेश आणि गोवा या तीन राज्यांचा समन्वयक म्हणून नासिर नदवी काम करत होते. औरंगाबाद शहरातल्या इंदिरानगर बायजीपुरा इथल्या घरातून त्याला अटक करण्यात आलीय.
अटक करण्यात आलेल्या चौघांची आता कसून चौकशी केली जाणार आहे. त्यातून नेमकी काय माहिती समोर येते, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान, या आधीच केंद्र सरकारकडून पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया या संस्थेवर बंदी घालण्यात आली होती. टेटर फंडिगचा आरोप या संस्थेवर आहे.
5 वर्षांची बंदी
केंद्रीय गुप्तचर संस्था, एटीएस, एनआए आणि ईडी यांनी संयुक्तपणे पीएफआय या संस्थेबाबत तपास केला होता. या तपासासून गंभीर बाबी समोर आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल तसंच एनआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठकही घेतली होती. त्यानंतर पीएफआयवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
आतापर्यंत पीएफआयशी संबंधित अनेक जणांवर अटक करण्यात आली आहे. राज्यातील मुंबई, नवी मुंबईसह वेगवेगळ्या भागातून पीएफआयशी संबंधित अनेकांना ताब्यात घेण्यात आलं होतं. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात पीएफआयच्या कार्यलयावर छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर पाच वर्षांसाठी पीएफआयवर बंदी घालण्यात आलीय.