PNB Scam : पीएनबी घोटाळ्यात धक्कादायक खुलासा, मेहुल चोक्सीच्या याचिकेतील कागदपत्रे गहाळ !
पंजाब नॅशनल बँक आर्थिक घोटाळा प्रकरणात आरोपी मेहुल चोक्सीच्या याचिकेसंदर्भातले कागदपत्रे सापडत नाही, असा दावा चोक्सीचे वकील अॅड. राहुल अग्रवाल यांनी गुरुवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी दरम्यान केला.
मुंबई : फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीच्या याचिकेवर सुनावणी दरम्यान धक्कादायक खुलासा झाला आहे. पंजाब नॅशनल बँक आर्थिक घोटाळा प्रकरणात आरोपी मेहुल चोक्सीच्या याचिकेसंदर्भातले कागदपत्रे सापडत नाही, असा दावा चोक्सीचे वकील अॅड. राहुल अग्रवाल यांनी गुरुवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी दरम्यान केला. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एनडब्ल्यू सांबरे आणि आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. लॉकडाउन आणि त्यांच्या कार्यालयाचे स्थानांतरण केल्यामुळे त्यांना स्वतःची याचिका, संबंधित कागदपत्रे सापडली नाही. सदर याचिकेबाबतचे कागदपत्रे गहाळ झाले आहेत. त्यामुळे मला माझे कागदपत्र पुन्हा तयार करावे लागतील, असा दावा यावेळी अॅड. राहुल अग्रवाल यांनी केला.
कोर्टाने जेव्हा याचिकेबाबत सीबीआयचे वकील हितेन वेनेगावकर यांना विचारला असता त्यांनी देखील याबाबत नकारात्मक उत्तर दिलं. त्यामुळे कोर्टाने अॅड. अग्रवाल यांना एक दिवसाचा वेळ दिला आहे. मात्र अग्रवाल यांना अधिक वेळ हवा होता.
कोर्टाचा चोक्सीच्या वकिलाला खोचक सवाल
“अशा महत्वाच्या क्लायंचटी कागदपत्रं गहाळ होण्याचा धोका तुम्ही कसा घेऊ शकता?” असा खोचक सवाल विचारला. न्यायमूर्तीच्या या टोमण्यामुळे कोर्टात एकच हशा पिकला.
यानंतर न्यायमूर्ती सांबरे यांनी “चोक्सी कुठे आहे?” असा सवाल केला. त्यावर अॅड. अग्रवाल यांनी चोक्सी अँटीगुआ येथे असल्याचे सांगितले. मात्र सीबीआयचे वकील वेनेगावकर यांनी उत्तर दिले.
पुढे अॅड. अग्रवाल म्हणाले की, ते अँटिगुआ येथे आहेत याची सीबीआयला जाणीव आहे. मात्र सीबीआयचे वकील अॅड. वेनेगावकर यांनी पुन्हा जोर देत सांगितलं की “गहाळ ” भ्रष्टाचारी आर्थिक गुन्हेगारीत सहभागी आरोपीविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे.
पुढील सुनावणी 17 फेब्रुवारी रोजी
खंडपीठाने या प्रकरणात 17 फेब्रुवारीला पुढील सुनावणी ठेवली आहे. बहुचर्चित कोट्यावधीच्या पीएनबी बँक आर्थिक घोटाळा प्रकरणातून चर्चेत आलेला मेहुल चोक्सी यांनी आरोग्याचे कारण देत प्रवास करू शकत नाही, असा दावा केला.
सीबीआय आणि ईडी चौकशी सुरु असलेल्या पीएनबी बँक घोटाळा प्रकरणी मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी दोघेही फरार आहेत. मेहुल चोक्सी याने वर्ष 2019 मध्ये त्याच्या विरोधात सीबीआय दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली.