कल्याण (पूर्व) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नातेवाईक असल्याच्या थापा मारुन अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या पिता-पूत्राला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राजन गडकरी आणि आनंद गडकरी अशी आरोपींची नावे आहेत. डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलिसांनी आरोपींना कर्नाटकातून बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी अनेकांची सोने स्वस्त दरात देतो म्हणून फसवणूक केली. तर कुणाला नोकरीचं आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केली. विशेष म्हणजे आरोपींनी घरातल्या सूनेवर गुन्ह्यांचा आळ घातला. त्यानंतर तिच्या मुलाला म्हणजे नातवाला घेऊन ते पळून गेले. अखेर महिलेने आपल्या पती आणि सासऱ्याविरोधात बंड पुकारत पोलिसांना सर्व माहिती दिली (Police arrest fraudsters pretending to be relatives of Union minister Nitin Gadkari)
डोंबिवली पश्चिमेत राहणाऱ्या अनेक जणांनी नोकरी लावण्याच्या नावाखाली तसेच स्वस्त भावात सोने घेऊन देण्याच्या नावाखाली राजन गडकरी आणि त्याचा मुलगा आनंद गडकरी यांना लाखो रुपये दिले. पण कुणालाच नोकरी लागली नाही आणि सोनेही मिळाले नाही. भाऊ नितीन गडकरी केंद्रीय मंत्री आहेत, असे सांगून गडकरी आडनावाचा फायदा घेत हे पैसे उकळले जात होते. मात्र, त्यांची लबाडी फार काळ टिकली नाही (Police arrest fraudsters pretending to be relatives of Union minister Nitin Gadkari).
लोकांना जेव्हा माहिती पडले की त्यांची फसवणूक झाली, तेव्हा त्यांनी पैसे परत करण्याचा तगादा लावला. तेव्हा राजन गडकरी आणि मुलगा आनंद गडकरी, राजनची पत्नी आणि आनंदच्या चार वर्षाच्या मुलाला घेऊन पसार झाले. पण ते आनंदची पत्नी गीतांजली गडकरी हीला सोबत घेऊन गेले नाहीत. आपल्या मुलाला आपल्याशी तोडून हे पळून गेल्याने गीतांजलीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. कारण तिच्याच बँक खात्यातून तिचा पती आणि सासऱ्याने सर्व व्यव्हार केले होते.
या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी फसवणूक झालेल्या अमोल पलसमकर यांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, गीतांजली हिच्या कबुली जबाबानुसार ती माफीची साक्षीदार झाली. तिने सासरे आणि पतीचे सगळे कटकारस्थान पोलिसांना सांगितले. तिने फसवणुकी संदर्भात आपल्याला काही एक माहित नसल्याचा जबाब पोलिसांकडे दिला. फक्त मला माझा चार वर्षाचा मुलगा परत आणून द्या. या आरोपींना लवकरात लवकर शोधा, अशी मागणी सून गीतांजली गडकरीने केली होती. त्यानंतर विष्णूनगर पोलिसांचे दोन पथक तपासासाठी रवाना झाले होते.