एटीएम मशीनसोबत छेडछाड करुन पैशांची वारंवार चोरी, कल्याणमध्ये सराईत गुन्हेगाराला बेड्या
कल्याणमध्ये एका सराईत चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या चोरट्याची हिंमत इतकी की तो एटीएम मशीन फोडून पैसे चोरुन न्यायचा. पण अखेर त्याचा हा कारनाना पोलिसांच्या लक्षात आलाय. तो गेल्या काही दिवसांपासून एटीएम मशीन फोडून पळून गेला होता. पण त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलंय.
सुनील जाधव, Tv9 मराठी, मुंबई | 1 नोव्हेंबर 2023 : यूट्यूबवर व्हिडिओ पाहून एटीएम मशीनची स्ट्रीप, पट्टी, स्क्रू ड्रायव्हर अशा विविध साहित्याने छेडछाड करत एटीएममधून पैसे काढणाऱ्या एका चोरट्याला बाजारपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सुनील शर्मा असे या आरोपीचे नाव आहे. त्याने अशाप्रकारे आणखी काही ठिकाणी चोरी केल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय. कल्याणमधील सहजानंद चौक परिसरातील एका बँकेच्या एटीएम मशीनशी छेडछाड करत एटीएममधून पैसे चोरल्याची घटना घडलीय. संबंधित घटना एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. याप्रकरणी बँक मॅनेजरने कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
याप्रकरणी गुन्हा दाखल होताच कल्याण झोन 3 चे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार, एपीआय रूपवते आणि पीएसआय मोरे यांच्यासह बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या इतर स्टाफने सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केला होता.
पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं?
या चोरट्याला पोलिसांची भणक लागताच तो उत्तर प्रदेशला पळून गेला. मात्र जवळ पैसे नसल्याने तो पुन्हा आपल्या राहत्या घरी कल्याणमधील रेतीबंदर परिसरात आला. मग काय, पोलिसांची आधीच त्याच्या घरावर नजर होती. तो जसा या परिसरात आला, त्यानंतर लगेचच पोलिसांनी सापळा रचून सुनील वर्मा याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपी सुनील वर्माची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. तो यूट्यूबवरील काही व्हिडिओ पाहून एटीएम मशीनमधून कसे पैसे काढायचे हे शिकला. त्यानंतर त्याने एटीएममध्ये चोरी सुरू केली. पोलिसाच्या म्हणण्यानुसार, हा आरोपी एक सराईत चोरटा आहे. तो मोजमस्तीसाठी एटीएममध्ये पैसे काढायचा. पोलिसांनी सध्या त्याला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.