Mumbai Theft : भांडुपमध्ये घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यांना बेड्या, चोरीचा मुद्देमाल हस्तगत
चोरीची तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपास सुरु केला. यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीच्या आधारे आणि तांत्रिक माहितीनुसार पोलिसांनी दोघा आरोपींच्या राहत्या घरातून मुसक्या आवळल्या.
मुंबई : भांडुप पोलिसांनी घरफोडी (Robbery) करणाऱ्या दोन सराईत चोरट्यां (Thieves)ना बेड्या ठोकल्या आहेत. राहुल बांगर आणि अंजली शेख अशी अटक (Arrest) करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. राहुल बांगरवर आतापर्यंत 26 चोरीचे गुन्हे दाखल आहेत. राहुल आणि त्याची साथीदार अंजली शेख या दोघांनी भांडुपमध्ये राहणाऱ्या अनिल तिवारी यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून घरातील चार लाख 57 हजार पाचशे रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरी केले होते. याप्रकरणी भांडुप पोलिसात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत त्यांना अटक केली.
सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींना अटक
अंजली शेख ही पहिल्यांदाच राहुल याच्या संपर्कात आली होती. रात्रीच्या वेळी चोऱ्या करताना पोलिसांना संशय येऊ नये म्हणून चकवा देण्यासाठी राहुल अंजलीला सोबत घेऊन फिरायचा. दोघांनी पहिल्यांदाच एकत्र चोरी केली होती. चोरी केलेले दागिने त्यांनी एका ज्वेलर्सच्या दुकानात विकला. चोरीची तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपास सुरु केला. यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीच्या आधारे आणि तांत्रिक माहितीनुसार पोलिसांनी दोघा आरोपींच्या राहत्या घरातून मुसक्या आवळल्या. तसेच पोलिसांनी चोरट्यांनी विकलेला शंभर टक्के मुद्देमाल ज्वेलर्सच्या दुकानातून हस्तगत केला आहे. पहिल्याच चोरीच्या प्रयत्नात या दोघांना पोलिसांनी गजाआड केलं. (Police arrested two thieves who stole gold jewelery in Bhandup)