मित्राच्या साथीने पतीची केली हत्या अन् रचला आत्महत्येचा बनाव; खाकीच्या दणक्यानंतर सत्य उजेडात
लोखंडेची हत्या केल्यानंतर त्याची पत्नी आणि तिचा मित्र घराला कुलूप लावून दुसऱ्या दिवशी परतण्याच्या उद्देशाने पुण्याला गेले. यातून दोघांनी पुरावे लपविण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे त्यांचा प्लान फसला.
मुंबई : आजच्या कलियुगात नात्यामध्येही कधी काय घडेल हे सांगता येणार नाही. अशाच एका प्रसंगात पत्नीने पतीचा काटा काढायचे ठरवले. त्यासाठी तिने पद्धतशीर कट रचला व तो कट यशस्वी करण्यासाठी तिने सोशल मिडिया (Social Media) तून मैत्रीचे सूत जुळलेल्या आपल्या मित्राशी हातमिळवणी केली. पुढे दोघांनी हत्येचा कट यशस्वी केला. विशेष म्हणजे पतीने आत्महत्या (Suicide) केल्याचा बनाव आरोपी महिलेने रचला. मात्र हे हत्याकांड (Murder) असल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. जालना जिल्ह्यात ही घटना घडली आहे. 26 वर्षीय वकील किरण लोखंडेची त्याच्या पत्नीनेच मित्राच्या मदतीने हत्या केल्याचे धक्कादायक कृत्य उघडकीस आले आहे. याप्रकरणी जालना पोलिस अधिक तपास करीत आहेत.
सिलिंडरच्या स्फोटात मृत्यू झाल्याचा बनाव
वकील किरण लोखंडेच्या मृत्यूच्या चौकशीतून धक्कादायक खुलासा झाला आहे. किरणचा मृत्यू एलपीजी सिलिंडरच्या स्फोटात झाल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले होते. पतीने स्वतःच जीवन संपवल्याचे नाटक महिलेने केले, मात्र पोलीस तपासात तिचे पितळ उघडे पडले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी मृत व्यक्तीची 23 वर्षीय पत्नी आणि तिच्या मित्राला अटक केली आहे. किरण लोखंडेची हत्या करून पुरावे नष्ट केल्याचा आरोप या दोघांवर आहे. 31 ऑगस्टच्या रात्री लोखंडी रॉडचा मार डोक्याला लागल्याने वकिल किरण लोखंडेचा मृत्यू झाल्याचे तपासात समोर आले आहे.
हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट केले
दोन्ही आरोपींनी लोखंडेचा गळा आवळून खून केला आणि पुरावे नष्ट केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. लोखंडेची हत्या केल्यानंतर त्याची पत्नी आणि तिचा मित्र घराला कुलूप लावून दुसऱ्या दिवशी परतण्याच्या उद्देशाने पुण्याला गेले. यातून दोघांनी पुरावे लपविण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे त्यांचा प्लान फसला.
गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे मृत्यू झाल्याचा बनाव
घटनेबाबत पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी सांगितले की, आरोपी महिला आणि तिचा मित्र घरी परतले असता लोखंडेच्या मृतदेहाला दुर्गंधी सुटल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी त्यांनी किरणच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याचा आरोप आहे. यानंतर आरोपींनी गॅस बर्नरचे रेग्युलेटर चालू केले, जेणेकरून लोखंडेच्या मृत्यूचे प्रकरण अपघाती असल्याचे दाखवण्यात आले आहे.
एलपीजी सिलिंडरच्या स्फोटामुळे ही घटना घडल्याचा दावा वकिलाच्या पत्नीने सुरुवातीला केला होता. परंतु घटनास्थळाच्या तपासात आणि प्राथमिक तपासात त्या व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आणि नंतर गुन्हा झाकण्यासाठी कट रचण्यात आला.
आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी
मृत किरणची पत्नी मनीषा आणि गणेश आगलावे अशी दोन आरोपींची नावे आहेत. गणेश आगलवे हा जालन्यातील बदनापूर तालुक्यातील रहिवासी आहे. या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पाच महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर झाली होती मैत्री
दोन्ही आरोपींची पाच महिन्यांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाली होती. मग दररोज चॅचिंग सुरु झाले. चॅचिंगदरम्यान मनिषाने घरच्यांनी तिच्या इच्छेविरुद्ध लोखंडेशी तिचे लग्न लावून दिल्याचे सांगितले. त्यानंतर किरण लोखंडेच्या हत्येचा कट शिजला. याप्रकरणी किरणच्या चुलत भावाने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.