Khopoli Accident : क्लासची पिकनिक जीवावर बेतली! खोपोली बस अपघातात दोन विद्यार्थी ठार
दहावीच्या 48 विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या खासगी बसचा खोपोली येथे भीषण अपघात
खोपोली : सहलीसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या बसचा मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोघा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर 20 हून अधिक विद्यार्थी जखमी झालेत. एकूण 48 विद्यार्थ्यांना घेऊन मुंबईतील खासगी क्लासची पिकनिक निघाली होती. या पिकनिकदरम्यान, संध्याकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास अपघात घडला. पुणे मुंबई एक्स्प्रेस हायवेवरील खोपोली जवळ बोरघाटात ही बस उलटली. या अपघातात हितीका खन्ना नावाची एक 16 वर्षांची विद्यार्थीनी तर राजेश म्हात्रे नावाचा 16 वर्षांचा विद्यार्थी मृत्युमुखी पडलाय.
अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर जखमी विद्यार्थ्यांचे पालकही प्रचंड धास्तावले आहे. सहलीला निघालेल्या बसचा अपघात झाल्याची ही दुसरी घटना रविवारी घडली. त्याआधी परभणीतही एसटी बस आणि स्कूल बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला होता.
खोपोली येथील अपघातातील बस हे मुंबईतील चेंबूर येथून मावळ येथे गेलेली. वेट एन जॉय नावाच्या थीम पार्कमधून ही बस पुन्हा विद्यार्थ्यांना घेऊन माघारी परतत होती. त्यावेळी चालकाचं बसवरील नियंत्रण सुटून ही बस बोरघाटात उलटली आणि एकच खळबळ उडाली.
पाहा व्हिडीओ :
या अपघातात जखमी झालेल्या 20 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी आणि स्थानिक बचाव यंत्रणांनी अपघातग्रस्त बसमधून विद्यार्थ्यांना तातडीने बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.
यातील काही विद्यार्थ्यांना खोपोली नगर परिषद रुग्णालयात आणि अन्य दोन स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर गंभीर जखमी झालेल्या 7 जणांना एमजीएण रुग्णालयात पुढील उपचारासाठी आणण्यात आली आहे.
जखमी विद्यार्थ्यांची नावं पुढीलप्रमाणे :
- श्रुती पाटील
- मानसी बोलके,
- रुद्र भागवत
- सिद्धी भोईर
- मानसी नरवरे
- यश गायकवाड
- अर्जुन देसाई
- आयुष पांचाळ
- प्राची शिगवण
- वेद पाटील
- आश्लेषा पोळ
- अर्चित सिंग
- तनिष पटेल
- राजगोपाल
- ओंकार गवळी
- आकांक्षा ठाकूर
- मृणाल पाटील
- चैतू ठाकूर, चालक
- अमीर शेख, वाहक
एकाच दिवशी सहलीला गेलेल्या बसच्या दोन अपघाताच्या घटनांमुळे पालक कमालीचे धास्तावले आहेत. सध्या शाळांच्या आणि खासगी क्लासच्या पिकनिक निघण्याचाच काळ आहे. अशा स्थितीत आता मुलांना सहलीला पाठवणं कितपत सुरक्षित आहे, अशी शंका पालकांना सतावू लागली आहे.