लग्न ठरल्यानंतर अश्लील मेसेज पाठवणे हा भावी जोडीदाराच्या विनयशीलतेचा अपमान नाही : कोर्ट
महिलेला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन फसवणूक आणि बलात्कार केल्याच्या आरोपातून 36 वर्षीय व्यक्तीची निर्दोष मुक्तता करताना सत्र न्यायालयाने ही निरीक्षणे नोंदवली. महिलेने 2010 मध्ये या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
मुंबई : ज्या महिलेसोबत विवाह होणार आहे, तिला ‘अश्लील संदेश’ (obscene messages) पाठवणे हे तिच्या विनयशीलतेचा अपमान (insulting modesty) करणारे आहे, असे म्हणण्याचे कारण नाही. प्रत्यक्ष लग्न सोहळ्यापूर्वी केलेल्या अशा मेसेजच्या माध्यमातून ती महिला आपल्या भावना समजून घेण्याइतपत मनाच्या जवळ आहे, हे सांगण्याचा तो एक मार्ग असू शकतो. परंतु तिला ते आवडत नसेल, तर ती आपली नाराजी उघड करु शकते, त्यानंतर तो अशी चूक पुन्हा करणे टाळेल, असे मुंबईतील सत्र न्यायालयाने म्हटले आहे. महिलेला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन फसवणूक आणि बलात्कार केल्याच्या आरोपातून 36 वर्षीय व्यक्तीची निर्दोष मुक्तता करताना सत्र न्यायालयाने ही निरीक्षणे नोंदवली. महिलेने 2010 मध्ये या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
‘जर अश्लील मेसेज समोरच्या व्यक्तीला आवडले नसतील, तर त्यांना आपली नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे सामान्यतः संबंधित व्यक्ती चुकांची पुनरावृत्ती करणे टाळते. यामागे आपल्या मनातील अपेक्षा तिच्यासमोर मांडणे, तिच्या लैंगिक भावना जागृत करणे, ज्यामुळे तिलाही आनंद मिळू शकेल, असा उद्देश असू शकतो, परंतु हे एसएमएस तिच्या विनम्रतेचा अपमान करण्यासाठी पाठवले गेले असे कोणत्याही प्रकारे म्हणता येणार नाही’ असे कोर्टाने म्हटल्याचे टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
2007 मध्ये संबंधित पुरुष आणि महिलेची भेट एका मॅट्रिमोनिअल पोर्टलद्वारे झाली होती. दोघे दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यांना लग्न करायचे होते. त्या व्यक्तीने तिच्यासोबत राहण्यासाठी घर भाड्याने घेतले होते. नंतर, त्याने कुटुंबाच्या मालकीचे एक अपार्टमेंट तिच्यासोबत राहण्यासाठी नूतनीकरण करुन घेतले होते. मात्र, त्याने त्या महिलेशी लग्न करावे, असे त्याच्या आईला वाटत नव्हते. त्यामुळे त्याच्या आईने कोणत्याही घरात दोघांना एकत्र राहू देण्यास नकार दिला होता.
बलात्काराचा गुन्हा
2010 मध्ये या व्यक्तीने महिलेशी संबंध तोडले, त्यानंतर तिने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन बलात्काराचा गुन्हा दाखल केला. लग्नाच्या प्रत्येक वचनाचा भंग केल्यास फसवणूक किंवा बलात्काराचा गुन्हा होऊ शकत नाही, असे म्हणत न्यायालयाने त्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली.
“तो मंगळसूत्र घेऊन आर्य समाज हॉलमध्ये गेला होता पण लग्नानंतर राहण्याच्या कारणावरून झालेले भांडण आणि त्यानंतरच्या समस्यांना कंटाळून, आईच्या इच्छेपुढे शरणागती पत्करत त्याने माघार घेतली” असे कोर्टाने म्हटल्याची माहिती आहे.
विवाह होण्यासाठी “भरीव प्रयत्न करण्यात अयशस्वी” ठरल्याचे हे प्रकरण असल्याचे सांगत न्यायालयाने पुरुषाने दिलेले लग्नाचे वचन खोटे असल्याचा महिलेचा दावा नाकारला. कोर्टाने पुढे म्हटले आहे की, लग्न करण्यापूर्वी महिलेने पुरुषाला तिच्यासोबत लैंगिक कृत्य करू देणे आवश्यक नाही. तिने हा पर्याय निवडला, कारण विरोधाची जाणीव असूनही हे लग्न होईल यावर तिचा आंधळा विश्वास होता. सुमारे 11 वर्षे न्यायासाठी लढणाऱ्या महिलेच्या भावनांचा आपण आदर करतो, असे न्यायालयाने म्हटले आहे. मात्र, या प्रकरणात पुरुषाकडून बलात्काराचा गुन्हा झालेला नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
संबंधित बातम्या :
बहिणीच्या आत्महत्येनंतर पत्नीचा खून, विषप्राशन केलेल्या पुण्यातील पतीचाही अखेरचा श्वास
मुंबईच्या मानखुर्द रेल्वे स्टेशनवर धारदार शस्त्राने हत्या, आरोपीला वाशीतून अटक
पूजा कावळे हत्याकांड: पतीच निघाला हत्येचा मास्टरमाईंड, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात