तिजोरीची डुप्लिकेट चावी बनवली, लाखोंचा ऐवज लुटला; असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात
एकदा मालकाच्या लॉकरची चावी हरवली होती. हा आरोपी चावीवाल्याकडे चावी बनवायला गेला होता. यावेळी त्याने दोन चाव्या बनवल्या. एक चावी त्याच्या मालकाला दिली आणि एक चावी स्वतःकडे ठेवली.
मुंबई : धनत्रयोदशीच्या दिवशी घरातील तिजोरीतून चोरीस गेलेला ऐवज परत मिळवण्यास कांदिवली पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी घरातील नोकराला बिहारमधील त्याच्या मूळ गावातून अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून 46 लाख 83 हजार 548 रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. श्रीकांत चिंतामणी यादव असे 34 वर्षीय आरोपीचे नाव असून, तो बिहारमधील जमुई जिल्ह्यातील रहिवासी आहे.
गेल्या 12 वर्षापासून काम करत होता
आरोपी श्रीकांत हा कांदिवली पश्चिम येथे राहणाऱ्या एका अर्किटेक्टच्या घरी गेल्या 12 वर्षांपासून काम करत होता. एकदा मालकाच्या लॉकरची चावी हरवली होती. हा आरोपी चावीवाल्याकडे चावी बनवायला गेला होता. यावेळी त्याने दोन चाव्या बनवल्या. एक चावी त्याच्या मालकाला दिली आणि एक चावी स्वतःकडे ठेवली.
डुप्लिकेट चावीच्या सहाय्याने वस्तू चोरायचा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डुप्लिकेट चावीच्या सहाय्याने प्रत्येक वस्तू चोरायचा. त्यामुळे घरातील सदस्यांना याची माहिती नव्हती. खूप वर्ष काम करत असल्यामुळे मालकाचा त्याच्यावर विश्वास बसला होता. यामुळे त्याच्यावर संशय आला नाही.
धनत्रयोदशीच्या दिवशी चोरीची बाब उघडकीस
धनत्रयोदशीच्या दिवशी मालकिणीने तिच्या आवडीचे दागिने शोधण्यास सुरुवात केली असता दागिने सापडले नाही. तेव्हा तिला संशय आला. तिने तिजोरी तपासली असता लाखोंचे सोने, रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू गायब असल्याचे दिसले.
आरोपीने सोन्याचे दागिने, सोन्याची बिस्किटे, महागडी घड्याळे आणि 41 लाख 50 हजारांची रोकड चोरून नेली होती. यानंतर मालकाने 26 ऑक्टोबर रोजी कांदिवली पोलीस ठाण्यात चोरी झाल्याची तक्रार दिली होती. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला.
नोकराला बिहारमधून अटक
तपासादरम्यान पोलिसांना कळले की, त्यांच्या घरी 12 वर्षांपासून एक नोकर काम करत असून, तो रजेवर आहे. पोलिसांना नोकरावर संशय आला. त्यानंतर कांदिवली पोलिसांनी बिहार राज्यातील जमुई जिल्ह्याच्या एसपीच्या मदतीने आरोपीला अटक केली.