Criminals in Uniform : मुंबई पोलिसांच्या रीडिंग लिस्टवर टॉप ‘क्रिमिनल्स इन यूनिफॉर्म’; जाणून घ्या काय विशेष आहे या पुस्तकात
खाकी वर्दीच्या आड लपलेला पोलिसांचा क्रूर चेहरा लेखकांनी जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. अँटेलियाबाहेर सापडलेली स्फोटकांनी भरलेली कार आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणावर हे पुस्तक आधारित आहे. यामध्ये अनेक सरकारी संस्था, सरकारी तपास यंत्रणा यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या पुस्तकामुळे पोलीस दलात सनसनाटी माजली आहे.
मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलात सध्या एकाच पुस्तका (Book)ची चर्चा सुरू आहे, ते म्हणजे ‘क्रिमिनल्स इन यूनिफॉर्म’ (Criminals in Uniform). खास करून आयपीएस लॉबीमध्ये या पुस्तकामुळे उत्सुकता निर्माण झालेली आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंनाही या पुस्तकात काय आहे हे जाणून घेण्यात विशेष रुची निर्माण झाली आहे. संजय पांडे (Sanjay Pande) यांच्या रीडिंग लिस्टमध्ये हे पुस्तक प्रथम क्रमांकावर आहे. या पुस्तकाचे कथानक आणि पार्श्वभूमी पोलिसांशी संबंधित आहे. तसेच यात मुंबई पोलिसांच्या CIU (क्राइम इंटेलिजन्स युनिट)चा वारंवार उल्लेख करण्यात आला आहे. केवळ संजय पांडेच नाही तर अन्य आयपीएस, पोलीस निरीक्षक आणि अन्य पोलीस कर्मचारी या पुस्तकाची मागणी करत आहेत.
वर्दीच्या आड लपलेला पोलिसांचा क्रूर चेहरा जगासमोर आणण्याचा प्रयत्न
जेष्ठ पत्रकार संजय सिंह आणि राकेश त्रिवेदी यांनी हे पुस्तक लिहिले आहे. संजय सिंह आणि राकेश त्रिवेदी जवळपास दोन दशकं गुन्हे पत्रकारिता करत आहेत. पुण्याच्या ‘मेहता पब्लिकेशन’ने ‘क्रिमिनल्स इन यूनिफॉर्म’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे. खाकी वर्दीच्या आड लपलेला पोलिसांचा क्रूर चेहरा लेखकांनी जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. अँटेलियाबाहेर सापडलेली स्फोटकांनी भरलेली कार आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणावर हे पुस्तक आधारित आहे. यामध्ये अनेक सरकारी संस्था, सरकारी तपास यंत्रणा यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या पुस्तकामुळे पोलीस दलात सनसनाटी माजली आहे.
पुस्तक काल्पनिक असल्याचा दावा
ज्यांच्यामुळे सुरक्षा यंत्रणा बदनाम झाल्या आहेत, अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी हे पुस्तक चांगलाच धडा असेल. यामुळे आपल्या सुरक्षायंत्रणेला बट्टा लागेल असे कोणतेही कृत्य भविष्यात त्यांच्याकडून घडणार नाही. कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी हे पुस्तक काल्पनिक असल्याचं सांगितलं जात आहे. कारण प्रत्यक्ष तर पुस्तकाच्या मुखपृष्ठावर अंबानींच्या अँटिलिया सदृश इमारतीचे चित्र वापरण्यात आलं आहे. एवढंच नव्हे, पुस्तकात एक-दोन व्यक्ती वा घटनांमध्येच साम्य आहे असं नाही तर, पानापानांवर प्रत्यक्षातल्या व्यक्ती आणि घटनांमधलं साम्य आढळून येत आहे. लेखकांनीही प्रस्तावनेत म्हटले आहे की, आमच्या पुस्तकातील पात्र, घटना वा इमारतीचं, प्रत्यक्षातील कुणाशी साम्य आढळत असलं, तर तो तो निव्वळ योगायोग आहे. (Top book criminals in uniform on Mumbai Polices reading list)