बोरीवलीत भाजप कार्यकर्त्याकडून महिलेचा विनयभंग, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर पोलीस ठाण्यात
बोरिवलीत भाजप नगरसेविका अंजली खेडेकर यांच्या कार्यालयात एका महिलेचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यावर विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल झाला आहे.
मुंबई : बोरिवलीत भाजप नगरसेविका अंजली खेडेकर यांच्या कार्यालयात एका महिलेचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यावर विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल झाला आहे. पण या प्रकरणी तक्रार करणाऱ्या पीडितेला मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित भाजप नगरसेविका आणि कार्यकर्त्यांनी पीडितेला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणावरुन महापौर किशोरी पेडणेकर यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात जावून माहिती घेतली. तर भाजप नगरसेविका अंजली खेडेकर यांनी एक वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेवर आता तक्रार का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच पद दिलं नाही म्हणून महिलेने हे आरोप केले, असंही खेडेकर म्हणाल्या आहेत.
पीडितेची प्रतिक्रिया
“एक मुलगा तिथे बसलेला होता. त्याला अंजली मॅडमने बाहेर पाठवलं. त्याने काचेचा दरवाजा बंद केला. तिथे नगरसेविकेसोबत आणखी दोन महिला होत्या. त्या तीनही महिलांनी तुमच्यासोबत काय झालं? असं विचारलं. मी त्यांना सगळं सांगितलं. आरोपी प्रतिकने माझ्यासोबत विचित्र वागणूक केली. त्याने माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयचत्न केला. माझे कपडे फाडण्याचा प्रयत्न केला. मी त्यावेळी कशीतरी तिथून पळाली होती. हा सर्व प्रकार मी त्यांना सांगितला. त्यानंतर चारही महिला उभ्या राहिल्या. त्यापैकी रेश्मा नावाच्या महिलेने माझ्या कानशिलात लगावली. तू खोटं बोलतेय, असं ती म्हणाली”, अशी प्रतिक्रिया पीडितेने ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना दिली.
भाजप नगरसेविका अंजली खेडेकर नेमकं काय म्हणाल्या?
“ज्यावेळी मी माझी पदाधिकारी महिला अध्यक्षा निवडली त्यानंतर तिला समजलं. त्यानंतर ती आमच्या नेत्यांकडे गेली. मला पद हवंय, अशी मागणी करु लागली. ते म्हणाले, अंजली ताईंना विचारलं का? त्यावर ती म्हणाली, मी नाही जात. तिने त्यांना आपल्यासोबत असं झाल्याचं सांगितलं. तेव्हा तिला कळलं का आपल्यासोबत असं झालं? नंतर मी तिच्याशी बोलली. तर त्याने माझी माफी मागावी, असं ती म्हणाली. त्याने तसं काही केलंच नाही तर तो का माफी मागेल?”, असा सवाल नगरसेविका अंजली खेडेकर यांनी उपस्थित केला.
किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया
दरम्यान, बोरीवली पोलीस ठाण्यास भेट दिल्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “पोलिसांनी कृती केलेली आहे. वस्तुस्थितीला धरुन त्यांनी नोंद केली आहे. फिर्यादीने सांगितलेली सर्व माहिती नोंद केली आहे. कोर्टात त्यांनी तपासाबाबत मागणी केली आहे. आरोपी आणि तक्रारदार यांचा सगळ्यांचा वस्तुनिष्ठ रिपोर्ट बनवला आहे. तो रिपोर्ट आम्ही सगळ्यांनी वाचला आहे. पोलिसांनी कुठेही कुचराई केलेली नाही. पीडिता एक वर्ष का थांबली? असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यावर पीडितेनं उत्तर दिलं आहे. पीडिता एक वर्ष आमदार-खासदारांकडे न्याय मागत होती. खासदारांनी तर लेखी लिहून दिलंय. नगरसेवकाकडे जा, असं खासदाराने लेखी लिहिलं होतं”, अशी प्रतिक्रिया पेडणेकर यांनी दिली.
“या घटनेत कोणतंही राजकारण असू नये. महिला आपल्याकडे न्याय मागायला येते तेव्हा त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन जावं. मुंबईचे पोलीस तप्तरतेने काम करतात. कायदा, पोलीस, सामाजिक भान, सामाजिक जबाबदारी महत्त्वाच्या असतात. महिलेवर अत्याचार होतात तर आपण न्यायासाठी उभं राहिलं पाहिजे”, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
हेही वाचा :
हा तर बापाच्या नावाला कलंक!! पोटच्या मुलीची तीन वेळा विक्री, गर्भपात करून जबरदस्तीने लावले लग्न
अवघ्या 15 वर्षाच्या मुलीवर 29 जणांकडून सामूहिक बलात्कार, पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार