ठाणे हादरलं! प्रेयसीला कारखाली चिरडलं, मित्रांच्या मदतीने जीवे मारण्याचा प्रयत्न

| Updated on: Dec 15, 2023 | 10:01 PM

ठाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका बड्या अधिकाऱ्याच्या मुलाने त्याच्या प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने आपल्या मित्रांच्या मदतीने पीडितेला थेट कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. आरोपी हा अनेक प्रमुख नेत्यांशी राजकीयदृष्ट्या जोडला गेला आहे. या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीदेकील घेतली आहे.

ठाणे हादरलं! प्रेयसीला कारखाली चिरडलं, मित्रांच्या मदतीने जीवे मारण्याचा प्रयत्न
Follow us on

गणेश थोरात, Tv9 मराठी, ठाणे | 15 डिसेंबर 2023 : घोडबंदर रोडवरील ओवळा भागात सोमवारी मध्यरात्री अश्‍वजीत गायकवाड या 34 वर्षीय मुलाने आपल्या मित्रांच्या मदतीने प्रेयसीला कारखाली चिरडले. यामध्ये पीडिता जबर जखमी झाली आहे. तिच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडितेने सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली आहे. दरम्यान, अश्‍वजीत हा एमएसआरडीसी खात्यात काम करणाऱ्या बड्या अधिकाऱ्याचा पुत्र असल्याने खळबळ उडाली आहे. घोडबंदर येथे राहणाऱ्या पीडित महिला या उच्चशिक्षित आहेत. या महिलेला सोमवारी मध्यरात्री साडेचार वाजेच्या सुमारास तिचा प्रियकर अश्र्वजित गायकवाड याने ओळवा येथील कोटियाड हॉटेल जवळ भेटायला बोलावले. महिला तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्यात काही वाद झाले. आरोपी
अश्र्वजित गायकवाड याने आपल्या प्रेयसीला शिवीगाळ करून जबर मारहाण केली. तसेच तिच्या डाव्या हाताला देखील चावा घेतला.

पीडितेच्या शरीरावर जखमा, आरोपी मोकाट

दरम्यान यावेळी आरोपीचा मित्र असलेल्या रोमील पाटील आणि सागर शेळके यांनी देखील चारचाकी गाडी पीडितेच्या अंगावर घातली. या घटनेत पीडितेच्या पायाला जबर मारहाण झाली असून शरीरावर जखमा झाल्या आहेत. संबंधित घटनेप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी मोकाट आहेत. दरम्यान, अश्वजीत गायकवाड हा ठाण्यातील अनेक प्रमुख नेत्यांशी राजकीयदृष्ट्या जोडलेला असून त्याचे वडील एमएसआरडीसी अधिकारी आहे.

‘साडेचार वर्षांपासून माझे अश्वजीत सोबत प्रेम’

पीडिताने सांगितले आहे की, गेल्या साडेचार वर्षांपासून माझे अश्वजीत गायकवाड सोबत प्रेम आहे. मात्र मला माहिती नव्हती की तो विवाहित आहे. मला त्या रात्री माहिती पडले की, तो विवाहित आहे. या अगोदर त्यांनी मला या गोष्टी सांगितल्या नव्हत्या. मी त्याला भेटण्यासाठी सांगितले. त्या ठिकाणी त्याची पत्नी सोबत होता. माझ्या बरोबर त्याने वाद घातला. माझ्यावर हल्ला केल्यानंतर मला शरीरावर दुखापत झालेली आहे. पोलिसांनी त्यावेळेस कोणतीही कारवाई केली नव्हती. माझ्या इंस्टाग्राम पोस्टमुळे आता कुठे पोलीस जागी झाली आहेत, अशी माहिती पीडित महिलेने दिली आहे.

पोलिसांनी आतापर्यंत काय कारवाई केली?

या प्रकरणावर ठाण्याचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी प्रतिक्रिया दिली. या प्रकरणात कासारवडवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पीडित महिलेने पुन्हा जबाब नोंदवण्याची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने देखील पोलीस पुन्हा जवाब नोंदवून घेणार आहेत. तसेच या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच त्या ठिकाणी असणारे साक्षीदार यांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. संबंधित प्रकरणातील तीनही आरोपी फरार आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास कसारवडवली पोलीस करत आहेत, अशी प्रतिक्रिया अमरसिंग जाधव यांनी दिली आहे.