‘तू जिंदगी भर कड़िया ही रहेगा!’, मित्राचे बोलणे जिव्हारी लागले अन्…
दोघे खूप चांगले मित्र होते. एकाच गावचे असल्याने एकमेकांच्या जवळ होते. मात्र एक गोष्ट दोघांच्या मैत्रीत काटा ठरली. मित्राची एक गोष्ट खटकली अन् मैत्रीचा करुण अंत झाला.
मुंबई : मुंबईतील बोरीवली परिसरात एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. मित्राची मस्करी करणे एका तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. मस्करी न आवडल्याने मित्राने तरुणाच्या डोक्यात हातोडा मारत त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. घटना उघड होताच अवघ्या तीन तासात कस्तुरबा मार्ग पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. राम पुकार साहनी असे आरोपीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलीस याप्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. हत्येमागे केवळ एवढेच कारण होते की जुना काही वाद होता याबाबतही पोलीस चौकशी करत आहेत.
आरोपी आणि मयत चांगले मित्र होते
कस्तुरबा मार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजितकुमार साहनी आणि राम पुकार साहनी हे दोघे कडीया काम करायचे. दोघेही एकाच गावचे रहिवासी असून, गेल्या काही वर्षापासून एकत्र काम करत आहेत. काल रात्री 12.30 वाजता दोघे मित्र नेहमीप्रमाणे रात्रीचे जेवण करून खोलीत गप्पा मारत बसले होते. दोघेही एकमेकांसोबत मस्करी करत होते. यावेळी अजितकुमार राम पुकारला म्हणाला की, ‘तू जिंदगी भर कड़िया ही रहेगा, मिस्त्री कभी नहीं बन सकता!’
मित्राचे बोलणे जिव्हारी लागले अन्…
अजितकुमारचे हे बोलणे राम पुकारच्या जिव्हारी लागले. यानंतर रागाच्या भरात आरोपीने घरात ठेवलेल्या हातोड्याने वार करून मित्राची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच कस्तुरबा मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतेदह ताब्यात घेतला. घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. यानंतर वेगाने तपास करत अवघ्या तीन तासात आरोपीला अटक केली आहे.