शेअर ट्रेडींगमध्ये फसवणूक करणाऱ्या बंटी बबलीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
माजी आमदार कृष्णा हेडगे यांनी मेहता दाम्पत्याविरुद्ध जूनमध्ये आंबोली पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. या जोडप्याने ब्लिस कन्सल्टंटच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले, ज्यामुळे शेकडो लोकांनी आपल्या आयुष्याची जमापुंजी गुंतवली मात्र त्यानंतर मेहता दाम्पत्य गायब झाले होते.
मुंबई : शेअर ट्रेडिंग फर्म घोटाळ्यात हजारो कोटींची फसवणूक (Share Market Fraud) केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सुरतमधून एका जोडप्याला अटक केली. आशेष मेहता आणि त्यांची पत्नी शिवांगी लाड मेहता असे या बंटी बबलीचे नाव आहे. अखेर पोलिसांना त्यांच्या मुसक्या अवळण्यात यश आले आहे. यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) शेअर ट्रेडिंग फर्मच्या स्थापनेद्वारे हजारो कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. मिळालेल्या माहितीवरून ईओडब्ल्यूने या जोडप्याला सुरतमध्ये अटक केली.
माजी आमदार कृष्णा हेडगे यांनी केली होती तक्रार
माजी आमदार कृष्णा हेडगे यांनी मेहता दाम्पत्याविरुद्ध जूनमध्ये आंबोली पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. या जोडप्याने ब्लिस कन्सल्टंटच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले, ज्यामुळे शेकडो लोकांनी आपल्या आयुष्याची जमापुंजी गुंतवली मात्र त्यानंतर मेहता दाम्पत्य गायब झाले होते. कृष्णा हेडगे यांनी देखील 30 लाख रुपयांची गुंतवणूक केल्याचे उघड झाले. हेगडे यांच्या मते, हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे 3 हजारांहून अधिक गुंतवणूकदार बळी पडल्याचा अंदाज आहे.
कमी वेळात जास्त पैसे कमाविण्याचे आमिष येते अंगलट
पैसै कमाविणे हे मेहनतीचे काम आहे. प्रत्त्येकाला वाटतं की, कमी मेहनतीत जास्तीत जास्त नफा व्हावा. यासाठी अनेक जण सोप्या पर्यायाच्या शोधात असतात. अशाच लोकांना ठगबाज हेरतात आणि नंतर त्यांची आर्थिक फसवणूक होते. अनेक जण या ठगबाजांच्या आमिषाला बळी पडतात आणि आपल्या आयुष्याची जमापूंजी या ठगबाजांच्या हवाले करतात. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या घटना या सातत्याने घडत असतात. याबद्दल वृत्तपत्र आणि टिव्हीवर बातम्या आपण पाहत असतो. सरकारकडूनही याची जण जागृती केली जाते मात्र अशा आमिषाला बळी पडणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.