तुझ्या गर्भात वाढणारं बाळ माझं नाही म्हणत मुंबईच्या पोलीस उपनिरीक्षकाचं घृणास्पद कृत्य, लाजिरवाणी घटना
मुंबई पोलीस नेहमी त्यांच्या चांगल्या कामांसाठी ओळखले जातात. त्यांच्या कर्तृत्वाचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटतो. पण मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका उपनिरीक्षकाने शरमेने मान खाली घालवेल असं कृत्य केलं आहे
सोलापूर : मुंबई पोलीस नेहमी त्यांच्या चांगल्या कामांसाठी ओळखले जातात. त्यांच्या कर्तृत्वाचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटतो. पण मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका उपनिरीक्षकाने शरमेने मान खाली घालवेल असं कृत्य केलं आहे. त्याने स्वत:च्या पत्नीवर अमानुष अत्याचार केला आहे. त्याने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन जे कृत्य केलं ते संताप आणणारं आहे. कायद्याचा रक्षक असूनही तो इतकं निर्घृणपणे कसं वागू शकतो? असा सवाल त्याच्या सासरच्यांकडून उपस्थित केला जातोय. याप्रकरणी पीडित पत्नीने सोलापूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईत पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या एका इसमाने संतापजन कृत्य केलं आहे. त्याने गर्भवती पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन तिच्या पोटावर जोराची लाथ मारली. यावेळी पत्नी वेदनांनी विव्हळत होती. पण आरोपीला जराही दया आली नाही. त्याने पत्नीला मारहाण करत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने पत्नीला तिच्या माहेरी सोलापूर जिल्ह्यात आणून सोडलं.
पीडित महिलेची पोलिसात तक्रार
याप्रकरणी पीडित पत्नीने आरोपी पतीच्या विरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्या तक्रारीत पीडितेने आपल्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. पतीने आपला गळा दाबला. त्यानंतर पोटात जोराची लाथ मारली. या मारहाणीमुळे रक्तस्त्राव होऊन गर्भपात झाला, असा आरोप महिलेने केला आहे. पतीने चारित्र्याच्या संशयावरुन हे सगळं कृत्य केल्याचं पीडितेने पोलिसांना सांगितलं आहे.
गेल्यावर्षी मोठ्या थाटामाटात लग्न
“तुझ्या गर्भात वाढणारं बाळ माझं नाही. ते काढून टाक. तुझं बाहेर कोणाबरोबर तरी संबंध आहेत”, असं म्हणत आरोपीने हे कृत्य केल्याचं पीडितेने सांगितलं. पीडितेचं गेल्यावर्षी आरोपी पतीसोबत लग्न झालं होतं. हे लग्न मोठ्या थाटामाटात दोन्ही कुटुंबाच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडीत झालं होतं. आरोपी हा मुंबईत पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असल्याने पीडितेच्या कुटुंबियांनी मोठ्या थाटात हे लग्न लावून दिलं होतं.
लग्नानंतर महिलेचा छळ
लग्नानंतर काही दिवस पती आणि सासरचे चांगलं वागले. पण हळूहळू ते त्रास देवू लागले. दीराने तर थेट विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप महिलेने केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी महिलेच्या पतीसह आणखी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एक पोलीस अधिकारी आपल्या पत्नीसोबत असं वागत असल्याने आपली किंवा समाजाची वाटचाल नेमकी कुठल्या दिशेला चालली आहे? याचा विचार करायला हवा. अशा घटना वारंवार समोर येत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्राची पुरोगामी अशी ख्याती आहे. या पुरोगामी महाराष्ट्रात असे कृत्य समोर येणं अपेक्षित नाही.
हेही वाचा :
आधी पप्पांना गाडीने उडवलं सांगितलं, नंतर वडिलांच्या हत्येची कबुली, तरुणाने असं का केलं?