आईवरुन शिवीगाळ केली, संतप्त रिक्षा चालकाने तरुणाला संपवले
हल्ला केल्यानंतर आरोपी पोलीस स्टेशनला आला आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
नागपूर / सुनील ढगे (प्रतिनिधी) : दारू प्यायल्यानंतर झालेल्या वादातून एका ई-रिक्षाचालकाने एका तरुणाची हत्या (Youth Murder) केल्याची खळबळजनक घटना नागपूर (Nagpur)मध्ये घडली आहे. घटनेनंतर आरोपी रिक्षा चालकाने स्वतः यशोधरनगर पोलीस (Yashodhar Nagar Police) स्टेशनला जाऊन या संदर्भात माहिती दिली. नागपूर शहरातील यशोधरा नगरमधील वीट भट्टी परिसरात ही घटना घडली आहे. प्रकाश उर्फ राजू लल्लू धकाते असे मृतक तरुणाचे नाव आहे, तर सतीश पांडुरंगा मुळे असे हत्या करणाऱ्या आरोपीचे आहे.
आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचा
आरोपी हा ई-रिक्षाचालक असून तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. मृत राजू हा बेरोजगार आहे. काल दुपारी दोघेही वीटभट्टी मैदानात दारू पित होते. यावेळी त्यांच्यात वाद झाला.
तरुणाने आईवरुन शिवीगाळ केल्याचा राग
भांडणामध्ये मयत तरुणाने आरोपीला आईवरून शिवीगाळ केली. त्यामुळे आरोपी चिडला आणि दोघांमध्ये हाणामारी झाली. आरोपीने मृतकाच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर दगडाने वार करून जखमी केले.
हल्ला केल्यानंतर आरोपीने स्वतः दिली पोलिसांना माहिती
हल्ला केल्यानंतर आरोपी पोलीस स्टेशनला आला आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी तरुणाला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
पोलिसांकडून आरोपीला अटक
यानंतर यशोधरनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. क्षुल्लक कारणावरुन सुरु असलेल्या हत्या सत्रामुळे नागपुरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.