Nagpur Crime : आधी गॅरेजमध्ये काम केलं, विना चावी बाईक सुरु करायला शिकला, मग जे केलं त्याने थेट तुरुंगातच गेला !
नागपुरात वाहन चोरांचा सुळसुळाट वाढत चालला आहे. चोरीसाठी चोरटे काय करतील याचा नेम नाही. नागपुरात अशीच चोरीची घटना उघडकीस आली आहे.
नागपूर / 2 ऑगस्ट 2023 : वाहन चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. चोरी करण्यासाठी चोरटे रोज नवनवीन फंडे वापरत आहेत. चोरट्यांचे फंडे पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत. अशीच आणखी एक घटना नागपुरात पुन्हा उघडकीस आली आहे. बाईक चोरणाऱ्या एका चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. बाईक चोरी करुन सेकंड हँडमध्ये विकायचा आणि पैसे कमवायचा. मात्र पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांनी अडवलं आणि चोरट्यांच बिंग फुटलं. गुन्हे शाखेने या चोरट्याला अटक केली आहे. रमजान अहमद असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस आरोपीची अधिक चौकशी करत आहेत.
आधी विना चावी बाईक सुरु करायला शिकला
आरोपीने आधी गॅरेजमध्ये काम केले. गॅरेजमध्ये काम करुन विना चावी बाईक कशी चालवायची ते शिकला. बाईकशी संबंधित सगळ्या बाबी त्याने शिकून घेतल्या. मग बाईक चोरीचा धंदा सुरु केला. त्याने विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच बाईक चोरल्या. गुन्हे शाखा युनिट 5 चे पोलीस पेट्रोलिंग करत असताना आरोपी विना नंबरची दुचाकी घेऊन फिरत असल्याचं निदर्शनास आलं.
पेट्रोलिंग दरम्यान अडकला पोलिसांच्या जाळ्यात
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तो योग्य माहिती देऊ शकला नाही. पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याची कडक तपासणी केली असता चोरीची घटना उघडकीस आली. आरोपीने पाच मोटरसायकल वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीतून चोरल्याची कबुली दिली. चोरीचा धंदा सुरु करण्याआधी प्रशिक्षण घेतल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. मात्र त्याचा हा चोरीचा धंदा फार दिवस चालू शकला नाही आणि तो पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.