कोट्यवधीच्या संपत्तीसाठी सासऱ्याचा गेम; मास्टरमाइंड अर्चना पुट्टेवार कोण?
नागपूरमधील हिट अँड रनचं प्रकरण चांगलंच गाजत आहे. अपघात वाटणाऱ्या या प्रकरणात ट्विस्ट आला आहे. हे प्रकरण अपघाताचं नसून हत्येचं असल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाची एक महिला मास्टर माइंड आहे. ती हत्या झालेल्या व्यक्तीची सून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागपूर हादरून गेलं आहे.
नागपुरात हिट अँड रनचं प्रकरण घडलं. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. आधी हे प्रकरण हिट अँड रनचं वाटलं. त्यामुळे पोलिसांनी तसा तपासही सुरू केला. मात्र, या प्रकरणात पोलिसांच्या हाती एक इनपूट आलं आणि संपूर्ण चक्रे फिरली. हा खून असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आणि पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. त्यानंतर एक एक धागा जुळत गेला आणि संपूर्ण प्रकरण समोर आलं. या प्रकरणात सूनेनेच सासऱ्याचा काटा काढल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत. सासऱ्याच्या हत्येमागची मास्टरमाइंड असलेली ही सून कोण आहे? काय करते? याची चर्चा रंगली आहे.
काय आहे प्रकरण?
22 मे रोजी ही हत्या झाली. नागपूरच्या मानेवाडा चौकात पुरुषोत्तम पुट्टेवार (वय 82) यांना एका कारने धडक दिली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. पुरुषोत्तम पुट्टेवार हे शुभम नगर येथील रहिवासी आहेत. सुरुवातीला हे प्रकरण हिट अँड रनचं वाटलं. त्यामुळे पोलिसांनी अपघाती प्रकरण म्हणून त्याची नोंद केली आणि तसा तपासही सुरू केला. पण चौकशी करत असताना पोलिसांना या प्रकरणात काही तरी काळंबेरं असल्याचं दिसून आलं. पुरुषोत्तम यांची हत्या झाली असून त्यामागे त्यांची सून अर्चना हीच मास्टरमाइंड असल्याचं उघड झालं.
हत्येसाठी सुपर किलर आणला
सासऱ्याचा गेम करण्यासाठी सून अर्चनाने सुपारी किलर आणला होता. तिने आधी सासऱ्याची हत्या करण्याची कल्पना भाऊ प्रशांत पार्लेवार याला सांगितली. प्रशांतने सुपारी किलर म्हणून सार्थक नावाच्या इसमाला जबाबदारी सोपवली. त्याला ड्रायव्हर म्हणून कामावर ठेवण्यात आले. सार्थकने 22 मे रोजी पुरुषोत्तम यांना कारने जोरदार धडक देऊन पलायन केलं. या धडकेत पुरुषोत्तम यांचा मृत्यू झाला. सचिन धर्मा आणि नीरज ऊर्फ नाइटी निमजे या दोघांच्या मदतीने सार्थकने ही हत्या घडवून आणली.
1 कोटीची सुपारी
या हत्येसाठी अर्चनाने सुपारी किलरला एक कोटीची सुपारी दिली होती. या कामासाठी त्याला 17 लाख रुपये अॅडव्हान्सही दिले होते. तसेच बारचे लायसन्स देण्याचे आणि बारसाठी जागा देण्याची डीलही झाली होती.
हत्येसाठी जुनी कार
हल्लेखोरांना मोक्षधाम घाटातील एका ऑटोमोबाइल फर्मकडून जुनी कार खरेदी केली होती. 1.60 लाखात ही कार खरेदी केली होती. त्यासाठी सार्थकने नीरजला 1.20 लाख रुपये दिले होते. तर सचिनने 40 हजार रुपये दिले होते. नीरज आणि सार्थक कारमध्ये होते. तेव्हा सचिन बाईकवरून तिथे आला. या तिघांनी पुट्टेवार यांच्या रिक्षाचा पाठलाग केला. जेव्हा पुट्टेवार रिक्षातून उतरले तेव्हा त्यांना कारने जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
डाव साधला
अर्चनाचा पती मनिष हे डॉक्टर आहेत. हत्या झाली त्या दिवशी ते कामावर होते. तिची सासू शकुंतला यांचं ऑपरेशन होतं. त्यामुळे त्या दवाखान्यात ॲडमिट होत्या. ही संधी साधूनच अर्चनाने सासऱ्याचा काटा काढल्याचं सांगितलं जातं. दवाखान्यातून पत्नीला पाहून येत असतानाच ही घटना घडल्याचंही पोलिसांनी सांगितलं.
हत्या का?
पुरुषोत्तम पुट्टेवार यांची नागपुरात कोट्यवधीची संपत्ती होती. या संपत्तीवरून पुट्टेवार यांच्या कुटुंबात वाद होते. हे वाद अत्यंत टोकाला गेले होते. पुरुषोत्तम आणि त्याचा मुलात संपत्तीचा वाद न्यायालयात सुरू होता. पुरुषोत्तम संपूर्ण संपत्ती दुसऱ्या मुलांना देतील अशी भीती अर्चनाला होती. त्या रागातूनच अर्चनाने सासऱ्याला मारण्याची सुपारी दिल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.
कोण आहे अर्चना?
अर्चना पुट्टेवार ही पुरुषोत्तम पुट्टेवार यांची सून आहे. गेल्या तीन वर्षापासून ती गडचिरोलीच्या नगर नियोजन विभागात सहायक संचालक म्हणून कार्यरत आहे. तिच्याकडे चंद्रपूर जिल्ह्याचाही प्रभार आहे. नगरक्षेत्रात विकास आराखडा मंजूर करताना अर्चनाने घोटाळा केल्याचाही आरोप आहे. अर्चनाचा नवरा मनिष डॉक्टर आहे.
कोण आहे प्रशांत?
प्रशांत पार्लेवार हा अर्चना पुट्टेवार हिचा भाऊ आहे. प्रशांत हा नागपूरच्या ऊंटखाना रोड परिसरात राहतो. त्याचे राजकीय लागेबांधे असल्याचंही सांगितलं जातं. प्रशांत हा केंद्र सरकारच्या ‘माइक्रो, स्मॉल एंड मीडियम इंटरप्राइजेस’चा संचालक आहे. त्यांचं ऑफिस नागपूरच्या सेमिनरी हिल्स येथील सीजीओ कॉम्प्लेक्स येथे आहे.
आरोपी कोण कोण?
प्रशांत पार्लेवार (58)
अर्चना पुट्टेवार (53)
पायल नागेश्वर (25)
नीरज निमजे
सचिन धार्मिक
सार्थक बागडे
कुणाशी काय संबंध?
अर्चना पुट्टेवार ही मयत पुरुषोत्तम पुट्टेवार यांची सून आहे.
प्रशांत पार्लेवार हा अर्चनाचा भाऊ आहे.
पायल नागेश्वर ही अर्चनाची सहाय्यक आर्किटेक्ट आहे. गडचिरोलीच्या दोघीही टाऊन प्लानिंग विभागात काम करतात.
सार्थक बागडे हा सुपारी किलर आहे. याच्याशी प्रशांतने संपर्क साधून त्याला खूनाची सुपारी दिली होती. त्याला अर्चनाच्या घरी ड्रायव्हर म्हणून कामाला ठेवलं
नीरज निमजे, सचिन धार्मिक हे दोघेही सार्थक बागडे याचे साथीदार आहेत.