वाशिम : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना कमी करण्यासाठी दिशा कायदा लागू करण्यात आला असला तरी महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये घट होताना दिसत नाहीय. काही नराधमांना पोलिसांची भीतीच नाही, असं चित्र दिसत आहे. कारण ते मागचापुढचा कोणताही विचार न करता मुलींवर अत्याचार करतात. असाच काहिसा प्रकार वाशिम जिल्ह्यात समोर आला आहे. घरात पीडितेचे आई-वडील नसताना आरोपी घरात शिरला. त्याने पीडितेचा विनयभंग केला.
संबंधित घटनेमुळे वाशिम जिल्हा हादरला आहे. पीडित 14 वर्षीय मुलगी ही घरात आपल्या बहिणीसह होती. यावेळी एक 28 वर्षीय आरोपी दारुच्या नशेत आला. या आरोपीचं नाव मुरलीधर पवार असं आहे. त्याने पीडितेच्या घरात शिरत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडितेने त्याचा प्रतिकार करण्याचा प्रचंड प्रयत्न केला. तसेच पीडितेने आरडाओरड केली. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तिची बहीण तिथे आली. पीडितेची बहीण तिथे आल्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला.
या घटनेमुळे अल्पवयीन पीडिता प्रचंड घाबरली आहे. तसेच आरोपी इतक्या विकृतपणे कसा वागू शकतो? असा सवाल परिसरातील नागरिकांकडून विचारला जातो. घटनेच्या वेळी पीडितेचे आई-वडील घरी नव्हते. नंतर ते आले तेव्हा त्यांना हा सगळा प्रकार समजला.
पीडितेच्या आई-वडिलांनी या घटनेवर प्रचंड संताप व्यक्त केला. तसेच त्यांनी तातडीने रिसोड पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिथे त्यांनी आरोपी विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आरोपी विरोधात पोक्सो आणि अॅट्रोसिटीसह इतर विविध कलामन्वये गुन्हे दाखल केले आहेत. आरोपी मुरलीधर पवार हा सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
हेही वाचा : चोर समजून सहाय्यक पोलीस निरीक्षकासह 4 जणांना मारहाण, गाडीवरही दगडफेक, नेमकं काय घडलं?