45 मिनिटात चोरट्यांनी घरात डल्ला मारला, पण नागपूर पोलिसांनी एकच धागा हेरला
नागपूरच्या शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील कालीमाता मंदिराजवळ राहणाऱ्या कृष्णा झा यांनी 20 एप्रिलला आपल्या घरी चोरी झाल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली होती.
नागपूर : नागपूरच्या शांतीनगर पोलिसांनी केवळ फिंगर प्रिंटच्या माध्यमातून 5 लाखांच्या चोरीची उकल केली. नागपूर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मोठ्या शिताफीने 45 मिनिटात आरोपीने घरात डल्ला मारला होता. (Nagpur Crime theft within 45 minutes police arrested two using finger prints)
45 मिनिटांत चोरांचा डल्ला
नागपूरच्या शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील कालीमाता मंदिराजवळ राहणाऱ्या कृष्णा झा यांनी 20 एप्रिलला आपल्या घरी चोरी झाल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली होती. फिर्यादीच्या घरची मंडळी लग्नासाठी बाहेरगावी गेली होती. फिर्यादी त्या काळात घरी एकटाच होता. जेवणासाठी तो आपल्या नातेवाईकाकडे गेला होता. 45 मिनिटात तो जेवण करुन घरी परत आला, त्या अवघ्या 45 मिनिटांच्या काळात चोरांनी घरावर डल्ला मारला होता.
5 लाख 30 हजारांचा मुद्देमाल चोरीला
झा घरी परतल्यावर त्यांचे सामान अस्ताव्यस्त पडले होते. तर कपाटाचे लॉक तोडून रोख आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 5 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन चोरटे पसार झाले होते. त्यानंतर कृष्णा झा यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात विचारपूस केली.
बोटांचे ठसे ठरले महत्त्वाचा दुवा
आरोपींच्या बोटांचे ठसे गेट आणि इतर सामानावरुन घेतले. आजूबाजूचा परिसरात तपास करण्यात आला आणि संशयावरुन आरोपी रुपेश पांडे आणि अब्दुल रहमान या दोघा जणांना अटक करण्यात आली. त्या दोन्ही आरोपींचे फिंगरप्रिंट घटनास्थळावरील फिंगर प्रिंटशी जुळले. आरोपींकडून पोलिसांनी तीन लाख तीस हजाराचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे.
कुठलाही पुरावा न सोडता आरोपीने ही चोरी मोठ्या शिताफीने केली होती. मात्र पोलिसांच्या नजरेतून हे आरोपी सुटू शकले नाहीत. त्यामुळे आरोपींनी कितीही चलाखी दाखवली, तरी पोलिसांच्या दोन पावलं पुढे जाणं अशक्य आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
संबंधित बातम्या :
दुकानदारावर गोळी झाडणार, तोच चिमुकलीची हाक, ‘बाबा’ ऐकून लुटारुंनी प्लॅन बदलला
रॉयल एनफिल्ड शोरूममधील चोरीचा छडा, सराईत चोरट्याला अखेर बेड्या
(Nagpur Crime theft within 45 minutes police arrested two using finger prints)