नागपूर : विकृतीला सीमा नसते. कोण कधी काय करेल याचा नेम नाही. आपण गुन्हा करतोय हेही अशा विकृतांच्या लक्षात येत नाही. नंतर त्याचे परिणाम व्हायचे तेच होतात. कधी तरी असे विकृत पोलिसांच्या जाळ्यात सापडतात आणि मग त्यांच्या गुन्ह्याचा शेवट तुरुंगात होतो. नागपुरातही एका अशाच विकृत व्यक्तीची विकृती समोर आली आहे. तो फेसबुकवरून मुलींना फ्रेंड बनवायचा. त्यानंतर त्यांना ऑनलाइन आणि ऑफलाईन जॉबची ऑफर द्यायचा. जॉबसाठी मुली आल्या की त्यांचे फोटो काढून त्यांच्याशी गैरवर्तवणूक करायचा. त्यांचे नको ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत या मुलींना ब्लॅकमेल करायचा. अखेर या नराधमाला पारडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने आतापर्यंत पाच ते सहा मुलींशी अशा प्रकारचे गैर कृत्य केल्याचं समोर आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण मुलींना फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायचा. त्यानंतर त्यांना जॉबची ऑफर करायचा. ऑनलाइन आणि ऑफलाइन जॉब असल्याचं सांगत या मुलींना मुलाखतीला बोलवायचा. मुली मुलाखतीला आल्यावर प्रशिक्षणाच्या बहाण्याने त्यांची छेड काढायचा. त्यांच्यासोबत सेल्फी काढायाचा. तसेच ऑफलाइन जॉब करायचा असेल तर तुला गाडी चालवता आली पाहिजे, नाही तर जॉब मिळणार नाही, असं सांगत या मुलींची गाडी चालवण्याची ट्रायल घ्यायचा. ट्रायल घेताना या मुलींशी नको ते वर्तन करत त्यांचे फोटोही काढायचा. मुलींनी जर विरोध केला तर तुझे फोटो व्हायरल करेन, अशी धमकी देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करायचा.
केवळ नागपूरच नव्हे तर इतर जिल्ह्यातील मुलींनाही तो टार्गेट करायचा. या मुलींनाही मुलाखतींना बोलावून त्यांच्याशी त्याच पद्धतीने वर्तन करायचा. अशाच एका बाहेर जिल्ह्यातील मुलींना त्याने मुलाखतीला बोलावून त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यांना नको तिथे स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याने त्या मुली घाबरल्या. हा तरुण अधिकच जबरदस्ती करू लागल्याने घाबरलेल्या या मुलींना तिथून पळ काढला आणि थेट पोलीस ठाणे गाठले. या मुलींनी पोलिसांकडे तक्रार दिली. या मुलींच्या तक्रारीनंतर आणखी चार ते पाच तक्रारी आल्या. त्यामुळे पारडी पोलीस सतर्क झाले आणि त्यांनी नराधमाचा शोध सुरू करत त्याला अखेर अटक केली, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत शिंदे यांनी दिली.
या घटनेनंतर मुलींनी कुणाच्याही अमिषाला बळी पडू नये म्हणून पोलिसांनी आवाहन केलं आहे. कोणत्याही खोट्या जाहिरातींना बळू पडू नका. आधी शहानिशा करा आणि मगच मुलाखतीला जा. सोबत कुणाला तरी घेऊन जा. एकट्या दुकट्या मुलाखतीला जाऊ नका. तसेच या प्रकरणी आणखी कुणाच्या तक्रारी असतील किंवा अशाच काही तक्रारी असतील तर मुलींनी पुढे यावं, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.