नागपूर : नागपूरला क्राईम कॅपिटल म्हणून संबोधलं जातं. कारण या शहरात अगदी क्षुल्लक कारणांवरुन हत्येच्या सर्रास घटना घडतात. शहरात कधी गँगवार तर कधी चोरी तर कधी हत्येच्या घटना वारंवार घडताना दिसतात. गुन्हेगारीच्या या वाढत्या गुन्ह्यांवरुन पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात येतो. त्यामुळे नागपूर पोलीसही आता अॅक्शन मोडवर आले आहेत. गुन्हेगारांच्या नांग्या ठेचण्यासाठी नागपूर पोलिसांनी आता ऑल-आऊट मिशन सुरु केलंय.
आपण ऑल-आऊट हे शब्द वाचले तर डोळ्यांसमोर टीव्हीवर येणारी मच्छरांना मारणारी ऑल-आऊट मशीनची जाहिरात नक्कीच येईल. ते ऑल-आऊट मशीन जसं मच्छरांसाठी यमराज ठरत त्यांचा नायनाट करतं अगदी तसंच नागपूर पोलीस शहरातील गुन्हेगारीतील सराईत मच्छरांचा नायनाट करणार आहेत. त्यासाठीच पोलिसांनी ऑपरेशन ऑल-आऊट ही मोहिम सुरु केली आहे. त्यानुसार पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार, धारदार शस्त्र आणि कट्टे (बंदूक) बाळगणाऱ्यांची चौकशी सुरु केली आहे.
नागपूरला गुन्हेगारी मुक्त करण्याचा संकल्प पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी घेतला आहे. पोलिसांकडून शस्त्र जप्त करण्याची मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेत पोलीस आर्म्स अॅक्ट गुन्हे नोंदवत आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाई करुन गुन्हेगारांवर अंकूश लावण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय. या अंतर्गत गेल्याच आठवड्यात क्रिकेट मॅच आणि ड्रग्ज माफियांवर नागपूर पोलिसांनी सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्यानंतर आता अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर देखील कारवाई केली जात आहे. पोलिसांकडून गुन्हेगारांच्या अड्ड्यांची आणि घरांची झडती घेतली जात आहे. वाढत्या गुन्हेगारी घटनांवर अंकूश मिळविण्यासाठी आणि गुन्हेगारांच्या मनात पोलिसांचा धाक निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे पोलीस आयुक्तांच्या धडक कारवाईमुळे अनेक गुंड भूमिगत झाले आहेत. आपण पोलिसांच्या रडारवर असल्याचं समजताच अनेकांनी गुन्हेगार मित्र आणि गुन्हेगारी क्षेत्र यांपासून काही अंतर राखायला सुरुवात केली आहे. पोलिसांच्या हाती लागल्यास दिवाळी तुरुंगात जाईल, अशी भीती गुन्हेगारांना वाटू लागली आहे.
वाहतूक सिग्नलवर वाहन चालकांवर कारवाई करताना पोलीस कर्मचाऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेता आता पेट्रोलपंपावरच पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. त्याठिकाणी विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्यांना, ट्रिपलसीट असणाऱ्या वाहन चालकांवर पोलीस कारवाई करणार आहेत. एवढंच नाही तर पूर्वीचं चलणदेखील वसूल केले जाणार आहे. या प्रयत्नांमुळे गुन्हेगारांना खीळ बसेल आणि गुन्हेगारी कमी होईल, असा विश्वास पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी व्यक्त केला. मात्र यात किती यश मिळेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
बचत गटवाल्या चौकडीने औरंगाबादेतल्या वकील महिलेलाही फसवलं, 18 लाखांचा गंडा घातल्याचं उघड