मसाज सेंटरच्या नावाने देहविक्रीचा नंगानाच, नागपूर पोलिसांनी सापळा रचला, डमी ग्राहक पाठवत पर्दाफाश
स्पा मसाज सेंटरच्या नावाने देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या आरोपींच्या नांग्या ठेचण्यात नागपूर पोलिसांना मोठं यश आलं आहे. पोलिसांनी या कारवाईत 4 पीडित मुलींची सुटका केली आहे. आरोपींनी पीडित मुलींच्या आर्थिक अडचणींचा फायदा घेत त्यांना देहविक्रीच्या दुनियेत ढकललं होतं.

सुनील ढगे, Tv9 मराठी, नागपूर | 18 जानेवारी 2024 : सर्वांची परिस्थिती सारखी नसती. आयुष्य जगणं फार कठीण आहे. जीवन जगण्यासाठी आज पैशांची आवश्यकता आहे, हे खरंच सत्य आहे. पण हे पैसे कमविण्यासाठी आपली मेहनत करण्याची तयारी असायला हवी. चांगल्या मार्गाने मेहनत करुन पैसे कमवावे, त्यातून आपला उदरनिर्वाह भागावयला हवा. पण काहीजण कळत-नकळत चुकीच्या व्यक्तींची संगत पकडतात आणि अराजकतेच्या माध्यमातून शॉर्टकट पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात. पण जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. जे वाईट आहे ते वाईटच आहे. त्यामुळे त्यातून मिळणार फळ हे चांगलं असूच शकत नाही. चुकीच्या कामांमधून मिळवलेले जास्तीचे पैसे हे क्षणिक सुख असतं. त्यामुळे याची जाणीव आपल्याला असायला हवी. अन्यथा त्याचे दुष्पपरिणाम भोगावे लागू शकतात. नागपूरमध्ये असेच दुष्परिणाम भोगायची वेळ काही जणांवर आली आहे. कारण आरोपी हे स्पा मसाज पार्लरच्या नावाने चक्क देहविक्रीचं रॅकेट चालवत होते. पोलिसांनी संबंधित स्पा मसाज पार्लवर धाड टाकत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
संबंधित घटना ही नागपूरच्या राणा प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी क्राईम ब्रँचच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. निलेंद्र उके, सरोज वर्मा, मनीषा फरकाडे असं तीनही आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्या मसाज पार्लरवर धाड टाकून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच पोलिसांनी या कारवाईतून 4 पीडित मुलींची सुटका केली आहे.
पोलिसांनी नेमकी कारवाई कशी केली?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींकडून पीडित मुलींच्या आर्थिक अडचणींचा फायदा घेण्यात येत होतो. आरोपींकडून मुलींना पैशाचं आमिष देण्यात आलं होतं. मुलींच्या आर्थिक अडचणींचा फायदा घेऊन आरोपींकडून हा देहविक्रीचा व्यापार केला जात होता. या कारवाईबाबत राणाप्रताप नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश काळे यांनी सविस्तर माहिती दिली.
आरोपींच्या या कूकृत्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. पोलिसांनी एक डमी ग्राहक स्पा मसाज सेंटर येथे पाठवला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना रंगेहात पकडलं. पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक केली. तर चार पीडित मुलींची सुटका केली. विशेष म्हणजे आरोपींचा गेल्या अनेक दिवसांपासून स्पाच्या नावाने हा देहव्यापार सुरु होता. अखेर पोलिसांनी संबंधित स्पा पार्लर बंद केलं आहे. पोलीस या प्रकरणी सखोल तपास करत आहेत.